Fraud based on fake bank guarantee, case registered against Bhavesh Kumar, Hiteshbhai, Hiren Kumar : बनावट बँक गॅरंटीच्या आधारे फसवणूक, भावेशकुमार, हितेशभाई, हिरेनकुमार विरोधात गुन्हा
Mumbai : राज्याच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरणमध्ये सुमारे 100 कोटी रुपयांच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत हा घोटाळा झाल्याचे समोर आले असून, 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत एका खासगी कंपनीने बनावट बँक गॅरंटीच्या आधारे महावितरणची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ओम यश सी.जे.आर. लामाट व्हिया प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक भावेशकुमार अश्विनभाई पटेल, हिरेनकुमार लावजीभाई कनानी आणि हितेशभाई राविया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महावितरणमधील एका अधिकाऱ्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी वीज खरेदी करार मिळवण्यासाठी संबंधित कंपनीने सुमारे 99 कोटी 50 लाख रुपयांची बँक गॅरंटी सादर केली होती. ही बँक गॅरंटी स्टेट बँक ऑफ इंडिया, जुनागड शाखा (गुजरात) यांच्या नावाची असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान ही बँक गॅरंटी पूर्णतः बनावट असल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी एसबीआयच्या नावाने बनावट ई-मेल आयडीचा वापर करून ही गॅरंटी खरी असल्याचा भास निर्माण केल्याचेही समोर आले आहे.
Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ
ही बनावट बँक गॅरंटी महावितरणच्या मुंबई येथील नवीकरणीय ऊर्जा विभागाकडे सादर करण्यात आली होती. तक्रारीनुसार, महावितरणच्या नवीकरणीय ऊर्जा विभागातील सहाय्यक महाव्यवस्थापक राहुल पन्हाळे यांनी ही बँक गॅरंटी खरी असल्याचे दाखवून संबंधित कंपनीला प्रकल्पाचे काम मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे. बँक गॅरंटी बनावट असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक ती खरी असल्याचे दर्शवून वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या बनावट बँक गॅरंटीच्या आधारे संबंधित कंपनीला मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत वीज खरेदी करार मिळवण्यात आला. मात्र नंतर ही गॅरंटी इनव्होक करण्याची वेळ आली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, महावितरणला ही रक्कम वसूल करता आली नाही आणि महावितरण तसेच राज्य शासनाची सुमारे 99.50 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्यात भावेशकुमार पटेल, हिरेनकुमार कनानी, हितेशभाई राविया आणि राहुल पन्हाळे यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता असून, बनावट कागदपत्रे, बँक गॅरंटी आणि संबंधित आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास केला जाणार आहे.
Pooja Khedkar : म्हणे नोकराचाच प्रताप; पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी अजब चोरी,
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेसारख्या महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पात इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे समोर आल्याने राज्याच्या प्रशासकीय आणि ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.








