Expectiong good job in the office improvement campaign : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम
Yavatmal राज्य शासनाच्यावतीने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांसह कार्यालयीन सेवांची सुधारणा होणार आहे. जिल्ह्यात सर्व विभागांनी ही मोहिम उत्तमपणे राबवावी. मोहिमेंतर्गत झालेली कामे कायमस्वरुपी उपयोगी पडेल, अशा स्वरुपाची असावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
सुधारणा मोहिमेंतर्गत राबवावयाच्या उपक्रमांचा राज्यस्तरावरून आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहिमेचे महत्त्व व करावयाच्या कामांची माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्यस्तरावरून मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी मोहिमेंतर्गत करावयाची कामे, उत्कृष्ट कामांसाठी कार्यालयांची निवड याबाबत राज्यातील सर्व विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या टप्प्यातील ही मोहिम मे महिनाअखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासकीय कार्यालयांनी संकेतस्थळांवर सुविधांची उपलब्धता, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोई-सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब, गुंतवणुकीस प्रोत्साहन, कार्यालयीन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावयाचे आहे.
या प्रत्येक उपक्रमाचे गुणांकन केले जाणार असून यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांना जिल्हा, विभाग व राज्यस्तरासाठी निवडून गौरव केला जाणार आहे. मोहिमेंतर्गत काम करतांना नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील, यावर भर देण्यात यावा. कार्यालयांनी केलेल्या कामांचे क्रॅास व्हेरीफिकेशन केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले काम या कालावधीत केले जावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दि.2 मे रोजी कार्यालयांचे विभागस्तरावर सादरीकरण होणार आहे. यातून निवडलेल्या कार्यालयांचे सादरीकरण राज्यस्तरावर होतील. या कार्यालयांची तपासणी राष्ट्रीय गुणवत्ता संस्थेकडून केली जाणार आहे. त्यामुळे विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या व आपल्या अधिनस्त तालुकास्तरीय कार्यालयात उत्तमोत्तम काम करावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.