Gadchiroli Police ranks second in the state : १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात राज्यात द्वितीय क्रमांक
Gadchiroli राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्व शासकीय विभागांना १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट देण्यात आले. या कार्यक्रमाच्या मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिस दलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखालील या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचा लौकिक अधिकच उंचावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधीक्षकांची नावे जाहीर केली. या यादीत गडचिरोली पोलिसांनी ८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. या मूल्यांकनात भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) ने कार्यालयीन सुधारणा, तक्रार निवारण, तंत्रज्ञानाचा वापर, गुंतवणुकीस चालना, सुलभ जीवनमान आदी १० निकषांच्या आधारे कामगिरीचे मूल्यमापन केले.
Bhartiya Seva Sadan : भारतीय सेवा सदन विश्वस्त मंडळ निवडणूक वादात
या मूल्यांकनात पालघर जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहिला, तर गडचिरोली आणि नागपूर ग्रामीण यांनी संयुक्तरित्या दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर जळगाव आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांचा क्रमांक लागतो. हे यश म्हणजे कार्यक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक मानले जात आहे.
गडचिरोली पोलिस दलाने मागील १०० दिवसांत विविध प्रलंबित कामांना गती देत नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये कार्यालयीन सुधारणा, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही, गुन्हेगारी नियंत्रण, तसेच जिल्ह्याच्या एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत उल्लेखनीय बदल घडवून आणले गेले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या यशाचे श्रेय संपूर्ण पोलीस विभागासह, अधिकारी व कर्मचारीवर्गास दिले. “हे यश केवळ माझे नाही, तर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्याने दिलेल्या परिश्रमांचे फलित आहे. आम्ही केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरतेच मर्यादित न राहता, नागरिकाभिमुख सेवा पुरविण्यावर भर दिला,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या यशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. विविध समाजघटक आणि स्थानिक प्रतिनिधींनी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले आहे. हे यश भविष्यातील कार्यात अधिक उर्जेने योगदान देण्याची प्रेरणा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.