Engineers association : ४ हजार कोटींच्या मर्यादेत ८९ हजार कोटींची कामं, ठेकेदार संकटात!

Works worth Rs 89,000 crore within the limit of Rs 4,000 crore : विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता; राज्य अभियंता संघटनेचा इशारा

Akola राज्यात ८९ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असतानाही, ठेकेदारांना केवळ ४ हजार कोटींचाच निधी वितरित करण्यात आल्याने अनेकांची बिले थकली आहेत. परिणामी, राज्यातील विकासकामे थांबण्याची वेळ आली आहे, असा इशारा राज्य अभियंता संघ व महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिला.

राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ठेकेदारांच्या बिलाची रक्कम रखडली आहे. सर्वाधिक थकीत बिले मुंबई, यवतमाळ व पुणे जिल्ह्यांतील आहेत.

गेल्या वर्षी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांची कामे एका वर्षातच मंजूर करण्यात आली, असा आरोपही भोसले यांनी केला. त्याचवेळी लाडकी बहीण यांसारख्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च करताना ठेकेदारांच्या बिला मात्र थकीत ठेवण्यात आल्या आहेत.

शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याने बिले अदा होत नसल्याचे भोसले म्हणाले. या प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कामासाठी मजूरही मिळेनासे झाले असून, काही निविदांमध्ये जाणीवपूर्वक जाचक अटी घालून ठरावीक मोठ्या ठेकेदारांनाच फायदा मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ठाणे येथे आयोजित अधिवेशनात राज्यातील २९ जिल्ह्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्याचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.