BJP MLA abused by police officer : ऑडिओ क्लिप व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ
Akola राज्यातील सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजप. याच पक्षाचे मुख्यमंत्री व त्यांच्याचकडे गृहमंत्री खाते असे असतानाही एका पोलीस अधिकाऱ्याने भाजप आमदारालाच फोनवर शिवीगाळ करत धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
आमदारांनी तत्काळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री साहेब, तुमच्या राज्यात हे काय सुरू आहे, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गुरांच्या कत्तलीसंदर्भातील एका प्रकरणात बार्शीटाकळी पोलीस निरीक्षकांना फोन करून माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुरे जप्त केली, मात्र नंतर गुरांची गाडी परत सोडल्याची माहिती आमदार पिंपळे यांना मिळाली.
Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!
ही बाब उघड होताच, आमदारांनी पुन्हा पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला. मात्र या वेळी निरीक्षकांनी उलट आमदारांनाच दमदाटी केली, अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. या संभाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. क्लिपमध्ये आमदार पिंपळे यांचा आवाज स्पष्ट असून, दुसरी व्यक्ती बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही ऑडिओ क्लिप पाठवून संबंधित ठाणेदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“ज्यांच्यावर कायदा रक्षणाची जबाबदारी आहे, तेच जर कायदा तोडणाऱ्यांना साथ देत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कोण पाहणार?” असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे.
राज्यात खून, दरोडे, चोरी, मारामाऱ्या अशा गुन्ह्यांचे सत्र सुरू असताना आता पोलीस अधिकारीच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही शिवीगाळ करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे “मुख्यमंत्री साहेब, तुमच्या राज्यात नेमकं काय सुरू आहे?” असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.