Five people from Buldhana in Pahalgam Hotel : फिरायला जाण्यापूर्वीच बातमी आली, हॉटेल व्यवस्थापनाने घेतली काळजी
Buldhana जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम या लोकप्रिय पर्यटनस्थळी काल (२२ एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी मोठा हल्ला चढवला. धर्म विचारून निवडक पर्यटकांना लक्ष्य करत अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या भीषण घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.
या हल्ल्याच्या वेळी बुलडाणा जिल्ह्यातील पाच पर्यटक पहेलगाममधील एका हॉटेलमध्ये अडकले होते. फायरिंग सुरू असतानाच ते बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मात्र, सुदैवाने हॉटेल चालकांनी त्यांना वेळीच सतर्क करत आतच थांबण्यास सांगितले आणि त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.
Ajit Pawar : काश्मीरमध्ये अडकलेल्यांना पर्यटकांना सुखरुप परत आणू, नातेवाईकांनी घाबरू नये !
या अडकलेल्या पर्यटकांमध्ये पत्रकार अरुण जैन यांचे लहान बंधू निलेश जैन आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. अडकलेल्या पाच जणांची नावे: निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत. हे सर्वजण सध्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. फायरिंगच्या आवाजाने ते अत्यंत घाबरले होते, अशी माहिती त्यांनी संपर्क साधून दिली आहे.
पहेलगाम परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत.
Encroachment removal campaign : व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, नाहीतर न्यायालयात खेचू
आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.