Breaking

Jammu – Kashmir Attack : जम्मू – काश्मीरमधील पर्यटनावर होणार दुरगामी परिणाम !

 

Tourism in Jammu and Kashmir will have reaching consequences : गेल्या १०-१२ वर्षांत वाढलेली पर्यटकांची संख्या होणार कमी

Nagpur : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे दुरगामी परिणाम होणार असल्याचे चित्र दिसते आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांवर या हल्ल्याचा मोठा परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांनी मिळेल त्या साधनांनी घरची वाट धरली आहे. यानंतर पुढील महिन्यातही पर्यटन कंपन्यांकडून आयोजित केल्या गेलेल्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पर्यटन कंपन्यांकडून मिळाली.

दहशतवादी हल्ल्याचा पहिला परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. विविध कंपन्यांनी आयोजित केलेले काश्मीर टूर रद्द करण्यात आले आहेत. वैयक्तिकरित्या जाणाऱ्या लोकांनीही आता काश्मीर दौऱ्यापासून दूरच राहण पसंद केले आहे. या हल्ल्यात २८ जण ठार झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा लोकांचा समावेश आहे. हल्ला झाला त्यावेळी तेथे नागपुरातील २०० च्या जवळपास पर्यटक होते. पण या पर्यटकांना कुठलीही हानी झाली नाही.

Jammu – Kashmir Attack : भय तिथले संपले नाही..!

गेल्या १० ते १२ वर्षांत काश्मीरमध्ये पर्यटन चांगले वाढले होते. भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मीरकडे पर्यटकांचा ओढा असतो. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे उन्हाळ्यात पर्यटक काश्मीरकडे धाव घेतात. गेल्या दोन वर्षांपासून तेथील सुरक्षा वाढली आहे. त्यामुळे या दोन वर्षांत सर्वाधिक लोक काश्मीरमध्ये फिरायला जात होते. पण या हल्ल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. परिणामी काश्मीरमधील पर्यटन कमी होणार, असे पर्यटनाच्या सहली आयोजित करणाऱ्या कंपन्यांचे संचालक सांगत आहेत.

Jammu – Kashmir Attack : नागपुरातील दोनशेवर पर्यटक अद्यापही अडकून, पण सुरक्षीत !

पुढील महिन्यात नियोजित असलेल्या काश्मीरच्या सर्व सहली रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास सर्वच लोकांनी ठिकाण बदलवून देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सहली रद्द करण्यात आल्या आहेत. मनात भीती असली की पर्यटनाचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे या हल्ल्याचे दुरगामी परिणाम जम्मू – काश्मीरमधील पर्यटनावर होण्याची शक्यता बळावली आहे.