Shocked by NCP leader’s move to BJP : रमेश बंग, अनिल देशमुख आणि सुनील केदारांना धक्का !
Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. अशात भाजपने नागपूर जिल्ह्यात विरोधकांना धक्के देणे सुरू केले आहे. पहिला धक्का भाजपने शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगण्यात दिला. नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती उज्वला बोढारे यांना भाजपने आपल्याकडे वळवले आहे.
उज्वला बोढारे यांच्यासोबत जवळपास दिडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाला. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. या प्रवेशाने हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री रमेश बंग, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार या तिघांनाही मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विसरायचेय अपयश!
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जेवढी मते रमेश बंग यांना मिळाली होती, त्यातील बव्हंशी मते आता भाजपकडे वळली आहेत. उज्वला बोढारे दोन वेळा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. तालुक्यात त्यांची चांगली वट आहे. संघटनेवर त्यांची पकड आहे. त्यांच्यासोबत जे १५० ते २०० पदाधिकारी भाजपमध्ये आले, त्यामध्ये १८ सरपंच, ९० ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यांचा समावेश आहे.
NCP Sharad Pawar : शरद पवार गटापुढे संघटन मजबूत करण्याचे आव्हान
राष्ट्रवादीचे निम्म्याहून अधिक पदाधिकारी उज्वला बोढारे यांनी भाजपमध्ये आणले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशासाठी हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी पुढाकार घेतला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय रणनिती आखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.