Bachchu Kadu will now surround all the ministers : आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी ३० हजार शेतकरी करणार रक्तदान
Nagpur : शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा आदी प्रश्नांना घेऊन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह आमदारांच्या घरासमोर ‘मशाल जलाओ’ आंदोलन केले होते. आता पुन्हा शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी ते राज्यातील मंत्र्यांना घेरणार आहेत.
येत्या काळात बच्चू कडू मोठे आंदोलन छेडणार आहेत. यासंदर्भात नागपुरात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी सहा दिवसांचा प्रवास करून राज्यातील मंत्र्यांना घेरणार आहेत. बारामती येथे पहीली मोठी सभा घेऊन रॅलीची सुरूवात करणार आहोत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ही रॅली जाणार आहे. त्यानंतर सर्व मंत्र्यांना घेरत पुढे जाऊ. शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी ही रॅली असेल.
Bachchu Kadu : सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री १२ वाजता पेटणार प्रहारची मशाल !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले, ते त्यांनी दिले पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. १४ मे रोजी राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबीर घेणार आहोत. या आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी किमान ३० हजार शेतकरी रक्तदान करणार आहेत. आता मागे हटायचे नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे. आमचे रक्त घ्या, पण रक्त सांडवण्याची वेळ येऊ देऊ नका, हे या आंदोलनातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
आंदोलनाचा पहिला टप्पा झाल्यानंतर राज्यभर किमान दोन हजार सभा घेऊन जनआंदोलन पेटवणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊनसुद्धा कार्यवाही होत नाही. त्यामुले आंदोलन करण्याची वेळ आली आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपचे सरकार चालवणारे संघाचे मुख्यालयही नागपुरात असल्याने आंदोलनाचा भडका उडवण्यासाठी नागपूरची निवड केली असल्याचे बच्चू कडू म्हणाले.