Awaiting inauguration of Collector, Tehsil office building : जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय इमारतीला लोकार्पणाची प्रतीक्षा
Akola जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाची इमारत बांधून तयार झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतींना लाेकार्पणाची प्रतीक्षा आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि हेवेदावे या उद्घाटनासाठी खोडा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय नवे मिळणार आहे. यासोबतच कुटुंब न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीचे बांधकाम जिजाऊ सभागृहाच्या बाजूला करण्यात येत आहे. रामदासपेठेतील क्रीडा संकुलात ३० कोटी रुपयांच्या निधीतून नाट्यगृह आणि जलतरण तलावाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. अकोला शहरात दक्षतानगर येथे नव्याने १३ मजली पोलिस वसाहत, नाट्यगृह, जलतरण तलाव, कुटुंब न्यायालय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून, आणखी वर्षभर तरीही या इमारतींचे बांधकाम होणार आहे.
सध्या तहसील कार्यालय हे ब्रिटिशकालीन अध्यापक विद्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. ही इमारत अनेक ठिकाणी जीर्ण झाली आहे. अशा धोकादायक इमारतीमध्ये तहसील कार्यालयाचा कारभार सुरू आहे.
शहरात उभारलेल्या टोलेजंग इमारती
नाट्यगृह : शहरातील रामदासपेठ भागात गत पाच वर्षांपासून भव्य असे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. तीन मजली ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ऑडिटोरियम हॉल, बाल्कनीसह इतरही सुविधा राहणार आहेत.
कुटुंब न्यायालय : जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या जागेमध्ये कुटुंब न्यायालयाची टोलेजंग इमारती उभी राहत आहे.
म्हणून होतोय विलंब
तहसील कार्यालयाची इमारत बांधून तयार झाली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचीही टोलेजंग इमारतही बांधून तयारी झाली आहे; परंतु या इमारतींच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने, या दोन्ही इमारती लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत.