Criticized the government over Farmers issue : राज्यात भांडवलशाही सरकार असल्याचा केला आरोप
Amravati शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी मंत्री यशोमती ठाकूर सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. हे सरकार भांडवलशाही सरकार आहे. यांना शेतकऱ्यांप्रती कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता नाही, असंही त्या म्हणाल्या. यशोमती ठाकूर मंत्री राहिलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. तेव्हाही त्यांना चुकीची कामे पटत नव्हती. संबंधितांना खडे बोल सुनावण्यात त्या कुठलीही कसूर ठेवत नव्हत्या. त्यामुळे ‘यशोमती ताई को घुस्सा क्यो आता है?’, असा प्रश्न जनतेला तेव्हाही पडायचा.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. या मुद्यावर बच्चू कडूंच्या ‘प्रहार’नंतर आता काँग्रेसनेही सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार भांडवलशाही सरकार असल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे.
राज्यात भांडवलशाहीचे सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीच देणे-घेणे नाही. त्यांच्या समस्यांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. असे आरोप काँग्रेस नेत्या, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना तुरीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळत होता. आज त्याच तुरीचे भाव सात हजारांपर्यंत गडगडले आहेत. यावरून सरकार कोणाचे भले करत आहे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सोयाबीन आणि कापसाला भाव नाहीच. आज तर तुरीलाही भाव नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे, असं त्या म्हणाल्या.
Urology Department of Sawangi Hospital : रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेने केली जन्मजात व्याधीवर मात !
या सरकारला फक्त शेतकऱ्यांचे मरणच दिसत आहे. अमरावतीत शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच भाव चार हजारांनी गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. तुरीला १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता. कपाशी व सोयाबीनमध्ये झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. या अपेक्षेचा भंग झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतमालाला भाव होते. आता शासनाच्या बेपर्वा व व्यापारीधार्जिण्या धोरणांमुळे शेतमाल मातीमोल भावात विकला जात असल्याचा आरोप ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.
कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्ती नाही
विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकारकडून आता कोणताही पुढाकार घेतला गेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील विरोधी पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहे.