Fuel discount for ST : सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ, वर्षाला 12 कोटी वाचणार !

Fuel concession support for ST Corporation in financial difficulty : आर्थिक अडचणीतील एसटी महामंडळाला इंधन सवलतीचा आधार

Mumbai : आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या एसटी महामंडळाला आता दिलासा मिळणार आहे. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी एसटी महामंडळाला डिझेलच्या सवलतीत वाढ दिली असून, त्याचा थेट फायदा महामंडळाच्या आर्थिक बचतीत होणार आहे. नवीन सवलतीनुसार, 1 ऑगस्टपासून प्रति लिटर 30 पैशांनी सवलत वाढवण्यात आली आहे. या वाढीमुळे एसटी महामंडळाला दररोज सरासरी 3.23 लाख रुपयांची बचत होणार असून, वार्षिक बचत सुमारे 11.8 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करत आहे. सध्या दिवसाला सरासरी 10.78 लाख लिटर डिझेल महामंडळाच्या 251 आगारांतील पेट्रोल पंपांवर पुरवले जाते. एसटी महामंडळ मोठा खरेदीदार असल्याने यापूर्वीही इंधन कंपन्यांकडून सवलत दिली जात होती.
मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून ही सवलत बदलण्यात आलेली नव्हती. परिणामी, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात सतत पाठपुरावा केला.

Last day for E-KYC : तर ४.८८ लाख लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद!

 

त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात तीन-चार वेळा बैठका घेण्यात आल्या. तसेच इतर खासगी इंधन कंपन्यांशीही वाटाघाटी करण्यात आल्या. यातच स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी देखील दाखवण्यात आली, ज्यामुळे सार्वजनिक कंपन्यांनी सवलतीत वाढ करण्याची तयारी दर्शवली. परिणामी, 1 ऑगस्टपासून दौलत दरात ही वाढ लागू होणार आहे.एसटी महामंडळ सध्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीतून जात आहे. इंधन सवलतीत वाढ ही निश्चितच दिलासादायक बाब असली तरी फक्त तिकीट विक्रीवर विसंबून राहून आर्थिक स्थैर्य मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे महामंडळाने इतर उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणेही तितकेच गरजेचे आहे.

Zilla Parishad School : ‘आमच्या शाळेला शिक्षक द्या हो,’ विद्यार्थ्यांचे आंदोलन

या निर्णयाबाबत मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. अशा वेळी जिथे शक्य आहे तिथे खर्चात काटकसर करून बचत करणे अत्यावश्यक आहे. इंधन सवलतीसारख्या उपाययोजनांमुळे थोडाफार दिलासा मिळतो. तसेच, उत्पन्नवाढीसाठी इतर पर्याय शोधून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा आमचा विश्वास आहे.”

______