Aseem Sarodes big claim : असीम सरोदे यांचा मोठा दावा
Mumbai : सुप्रीम कोर्टाचे कायद्याचे हात येत्या महिनाभरात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपवतील, असा मोठा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर सुरु झालेला पक्षनाव, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर आला असून, 15 सप्टेंबरनंतर किंवा ऑक्टोबरमध्ये अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
असीम सरोदे यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत करत म्हटले की, कुणीही कसेही पक्ष फोडतील, पळवतील ही असंविधानिक प्रक्रिया न्यायालय मान्य करणार नाही. राज्यपाल पदावरील व्यक्तीने बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला, निवडणूक आयोगाने कायद्याबाह्य भूमिका घेतली आणि विधानसभा अध्यक्षांनी तटस्थ न राहता काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे असून, ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याविरोधात लढत आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होणार असून, त्यांच्या व्यस्ततेमुळे निर्णय लांबलेला आहे. मात्र 15 सप्टेंबरनंतर अंतिम तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम करू शकतो.
____