State Election Commission announcement :
राज्य निवडणूक आयोगाची घोषणा
Nashik : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. ऑक्टोबर अखेरपासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांचे टप्प्याटप्प्याने आयोजन केले जाणार आहे. नाशिक येथे पार पडलेल्या निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीनंतर वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक असून त्याचाच भाग म्हणून नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात एकूण ५० लाखांहून अधिक मतदार असून, ४,९८२ मतदान केंद्रांसाठी १७,००० हून अधिक ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे निवडणुका एकत्र घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. मात्र, कुठल्या संस्थेपासून सुरुवात होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
Narendra Bhondekar : विधानभवनातील ‘ती’ हाणामारी घातपात करण्याच्या उद्देशाने तर नव्हती !
प्रभाग रचना आणि मतदार यादीच्या आधारे निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जाणार असून, १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीचा आधार घेण्यात येईल. VV-PAT यंत्रांचा वापर यावेळी होणार नसल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
आरक्षणासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती व जमातींसाठीचे आरक्षण निश्चित आहे. मात्र, ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मागील निवडणुकांप्रमाणेच ओबीसी आरक्षण देण्यात येईल.
दिवाळीनंतरच्या निवडणुकांच्या तयारीला गती मिळणार असून, निवडणूक आयोगाकडून प्रशासन, कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणांचा आढावा सुरू आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तांतरासाठीचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे.
_____