Former minister criticizes state government : जानकरांचा सत्ताधाऱ्यांवर टोला, नुकसान भरपाईची मागणी
Buldhana “शासन कर्जमाफी करणार आहे. त्यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. उशिरा का होईना, कर्जमाफी करतो म्हणून बोलायला लागले आहेत. पण केवळ कर्जमाफीवर न थांबता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही द्यावी आणि शेतकरी राजाला सुखी करावे,” असा सत्ताधाऱ्यांवर टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावला.
जानकर यांनी शिंदी आणि साखरखेर्डा भागातील पूरग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून तहसीलदार अजित दिवटे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, “सिंधखेडराजा विधानसभा मतदारसंघात कोण लोकप्रतिनिधी आहे, यापेक्षा लोकांच्या अडी-अडचणी कोण सोडवतो, याकडे जनता डोळस नजरेतून पाहते.”
Ladki Bahin Scheme : एका रेशनकार्डवर एकीलाच लाभ; नणंद-भावजय, सासू-सूनेत पेटले वाद!
जानकर यांनी पाहणीदरम्यान सांगितले की, शिंदी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेरा बु. शिवारात पाणी साचल्याने जमीन खरडली, पिके वाहून गेली, घरांमध्ये पाणी घुसल्याने ४०-५० घरांचे नुकसान झाले.
आजही शेतात पाणी साचलेले असून सोयाबीन शेंगांवर बुरशी वाढून शेंगा काळ्या पडल्या आहेत. यामुळे एकरी एक क्विंटल उत्पादनही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी रमेश खरात, नितेश खरात, मंगेश बंगाळे, संतोष खरात, राहुल खंडारे, किरण खंडारे, सुनील खंडारे, रतन खंडारे, अप्पा आटोळे, विशाल आटोळे यांसारख्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा जानकर यांच्यासमोर मांडली.
Project affected farmers : जिगावनंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्त आक्रमक!
जानकर यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, प्रदेश सचिव संजय कन्नावार, नरेश मंडल, जिल्हाध्यक्ष कारभारी गायकवाड, संपर्कप्रमुख अतुल भुसारी, तालुका अध्यक्ष संतोष वनवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यातून राजकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या बाजूने उभे असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे जाणकारांचे मत आहे.








