Collector of Dharashiv, Kirtikumar Pujar, Immersed in Dance and Music : नाचगाण्यांतून वेळ मिळेल तेव्हा होतील पंचनामे
Nagpur : विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार उडवला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेतांमध्ये, रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. शेतकरी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री बांधांवर फिरत आहेत. जो – तो आपआपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. धाराशिव जिल्ह्यातही पुराने थैमान घातले आहे. पण येथील जिल्हाधिकारी मात्र नाचण्यागाण्यात मग्न आहे. जिल्ह्याचा प्रमुखच असा वागत असेल तर मग इतरांना काय म्हणावे, असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले. खायला दाणा उरला नाही. पिकं बुडाली, आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट परिस्थिती आलेली असताना धाराशीवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नाचत आहेत. शेतकरी ढसाढसा रडत असताना जिल्हाधिकारी नाचगाणे करत आहे. यावरून त्यांना पूर परिस्थितीचे काय गांभीर्य आहे, हे लक्षात येते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधांवर फिरत असताना जिल्हाधिकाऱ्याची येवढी हिंमत झालीच कशी? की सरकार फक्त मदत करत असल्याचा देखावा करत आहे, असेही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहे. सरकार जर खरंच शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असेल तर एखादा जिल्हाधिकारी असा बेताल वागू शकत नाही, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी पुजार यांच्या नाचण्याचा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी X वर पोस्ट केला आहे.
ZP Teachers’ Transfers : न्यायालय श्रेष्ठ की महामुनी व आमदार सुधाकर अडबाले ?
संकटाच्या परिस्थितीत जिल्हाचा प्रमुख अशा पद्धतीने वागत असेल, तर प्रशासन किती सक्षम आहे, हेसुद्धा लक्षात यावे. त्यामुळे आता मदत मिळेल, ही अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेऊ नये. अशा अधिकाऱ्यांना जेव्हा नाच-गाण्यांतून वेळ मिळेल, तेव्हा कुठे पंचनामे होतील आणि त्यानंतर मदत मिळेल. जसे सरकार तसेच प्रशासन आहे. जिल्हाधिकाऱ्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या बांधांवर गेले पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे. पण हे महाशय नाचगाण्यांत मग्न आहे. या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.








