Tribal Development Minister Dr. Ashok Uike’s Convoy Stopped Protesters Bow Down in Agitation : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा ताफा रोखून घातले होते लोटांगण
Wani – Yavatmal : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे ६ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा ताफा अडवून, काळे झेंडे दाखवून त्यांच्या वाहनासमोर शिवसैनिकांनी लोटांगण घातले होते. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली होती. अनेक घडामोडींनंतर अखेर काल (१० ऑक्टोबर) आंदोलक शिवसैनिकांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर यवतमाळ – वणी मार्गावरील गावांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यवतमाळ कारागृहातून वणीकडे परतताना कळंब – राळेगाव – खैरी – वडकी – मार्डी – नांदेपेरा – वणी असा त्यांच्या प्रवासाचा मार्ग होता. या मार्गावरील प्रत्येक गावात शेतकरी आणि नागरिकांना फुलांचा वर्षाव करत आणि घोषणांच्या गजरात शिवसैनिकांचे स्वागत केले. ‘शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा वातावरणात दुमदुमल्या. ओला दुष्काळ घोषीत करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेनंतर जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते.
Arvind Sawant : ओला दुष्काळ जाहीर करा, ठाकरे गटाचा जिल्हा कचेरीत ठिय्या!
६ ऑक्टोबर रोजी वणी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल मांडत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या वेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी अडवून रास्ता रोको केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करत कार्यकर्त्यांना अटक केली.
अॉड. विप्लव तेलतुंबडे यांची प्रभावी बाजू..
९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील विप्लव तेलतुंबडे यांनी अटकेत असलेल्या सर्व शिवसैनिकांची बाजू ठामपणे मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले की, “हे आंदोलन पूर्णपणे शांततेत झाले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाला गुन्हेगारी कृत्य म्हणून रंगवणे हा सरळ अन्याय आहे.” न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
आघाडीवरील कार्यकर्ते..
या आंदोलनात आणि सुटकेनंतरच्या स्वागत सोहळ्यात शिवसेनेचे (उबाटा गट) जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख संतोष मारेगाव, तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे, माजी नगरसेवक राजू तुराणकर, प्रेमा धानोरकर, गणपत लेडांगे, भगवान मोहिते, जगन जुनगरी, संकेत मोहिते, मोहम्मद अन्सार, मनीष बत्रा, दिवाकर कोल्हेकर आदींचा समावेश होता.
IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !
विजय दिवस..
सुटकेनंतर शिवसेना आमदार संजय देरकर यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले
“शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण अखेरीस सत्याचा विजय झाला. शिवसेना शेतकऱ्यांसाठीचा लढा अधिक जोमाने लढत राहील.” या संपूर्ण घटनेने वणी तालुक्यात उत्साह आणि अभिमानाची लाट उसळली आहे. शेतकरी, नागरिक आणि शिवसेना समर्थक सर्वांनी मिळून हा दिवस “शिवसैनिकांचा विजय दिवस” म्हणून साजरा केला.








