Leaders make unanimous demand to the high command : नेत्यांची हायकमांडकडे एकमुखाने मागणी
Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावे आणि ठाकरे बंधुंसोबत युती करू नये, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. सोमवारी सांताक्रुझमधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत ही भूमिका एकमुखाने मांडण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी अध्यक्ष भाई जगताप आणि ज्योती गायकवाड यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती ठरविण्यावर चर्चा झाली. बहुतांश नेत्यांनी ‘एकला चलो रे’ ही भूमिका मांडत, काँग्रेसने महाविकास आघाडी किंवा ठाकरे बंधुंसोबत कोणतीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे की, ठाकरे बंधुंशी युती केल्यास त्याचा फायदा फक्त शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच होईल, तर काँग्रेसला त्याचा तोटा होईल.
Local body election : राज ठाकरे यांनाही काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा;
काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत ‘नो कॉम्प्रोमाईज’ धोरण अवलंबल्याची माहितीही समोर आली आहे. मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्यासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असली तरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते या प्रस्तावाला फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस ‘स्वबळावर लढण्याच्या’ भूमिकेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री
या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी ठाकरे बंधुंसोबत युती नको याची कारणेही स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला होतो, मात्र काँग्रेसला त्या बदल्यात मतांचा लाभ मिळत नाही, असे मत बैठकीत मांडण्यात आले. तसेच ठाकरे बंधुंना सोबत घेतल्यास अल्पसंख्याक मतदार काँग्रेसपासून दूर जातात, यामुळे युतीचा तोटा काँग्रेसलाच होतो, असे नेत्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही जागेवर ‘मैत्रीपूर्ण लढत’ नसावी, काँग्रेसने पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढावे, अशी मागणी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. “स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलाही सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची भूमिका आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की हा निर्णय झाला आहे,” असे राऊत म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे आणि काँग्रेसचेही. शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे आवश्यक आहे, ही भूमिका राज ठाकरे यांचीही आहे.”
काँग्रेसच्या या ठाम भूमिकेमुळे ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महाविकास आघाडीच्या एकतेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
____