Opposition Alleges Election Commission Server Run by Outsiders : निवडणूक आयोगाचे काम पारदर्शक प्रक्रियेच्या विरोधात
Nagpur : सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल (१५ ऑक्टोबर) निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आदी पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मु्ख्य अधिकाऱ्यांना मतदार यादीतील अनेक चुका पुराव्यानिशी दाखवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी काही महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या पत्त्यावर राहात नाहीत. घर क्रमांक चुकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवले गेले आहेत. नाशिकमध्ये एकाच घरात ८१३ मतदारांची नोंद आहे. नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव वेगवेगळ्या EPIC ID सह असल्याचे न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुराव्यांसह प्रसिद्ध केले गेले. त्यानंतर मात्र ते हटवले गेले.
सुषमा गुप्ता यांचे नाव हटवण्यासाठी तक्रार कुणी केली होती, असा प्रश्न जयंत पाटील यांनी आयोगाला विचारला. राज्य किंवा केंद्रीय आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसराच कुणीतरी चालवतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणुकीत मतदान झाल्यावर किती पुरुषांनी आणि महिलांनी मतदान केलं या याद्या दर तासाला जाहीर होतात. पण विधानसभेला ही सिस्टीम मोडण्यात आली. कोणी किती मतदान केलं हे दोन दिवसानंतर जाहीर करण्यात आले. हे पारदर्शक प्रक्रियेच्या विरोधात आहे. नुकताच शिंदे गटाच्या आमदाराने जाहीरपणे सांगितले की, २० हजार मतदार बाहेरून आणले, त्यामुळे विजय झाला. या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीरपणे दखल घ्यावी, मतदार कसे आले, याची चौकशी करावी असंही पाटील म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत घोळ झाले होते,त्याची तक्रार आम्ही करूनदेखील कारवाई झालेली नाही. आता तीच यादी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुका पारदर्शक असणार नाहीत. देशपातळीवर राहुल गांधी यांनी हाच मुद्दा मांडला आहे. पण निवडणूक आयोग जबाबदारी झटकत आहे. निष्पक्ष निवडणुका झाल्या नाही तर हा लोकशाहीला मोठा धोका होईल, अशी टीका थोरात यांनी केली.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मतदारयादीतील मतदार आणि त्यांच्या वडिलांचे वय यातील तफावत दाखवली. मतदारांचे वय आणि त्यांच्या वडिलांच्या वयातील तफावत पाहता कोण कोणाचे वडील आहेत हा प्रश्न उपस्थित होतो, असा टोला राज ठाकरे यांनी मारला. राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार यादी दाखवत नाही इथेच घोळ आहे, अशी टीका ही राज ठाकरे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी हे कठपुतली आहेत का, असा सवाल उपस्थित केला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी राजुरा मतदारसंघातील घोळाबाबत माहिती दिली. या मतदारसंघात भाजप नेत्याच्या मोबाईलवर ओटीपी आला, तो कसा? याबाबत आम्ही तक्रार करूनही कारवाई झालेली नाही, असे ते म्हणाले.