Sharad Pawar criticizes inadequate help for flood-affected farmers : पूरग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी मदत शरद पवारांची टीका
Baramati : राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत अपुरी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर “काळी दिवाळी” साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
“मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन वेगळा आहे. मला या विषयात राजकारण आणायचं नाही, पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोकळ्या हाताने मदत करायला हवी होती. आम्ही त्यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली होती. मात्र आतापर्यंत सरकारची तयारी दिसलेली नाही,” असे शरद पवार म्हणाले.
MLA Kardile passes away : आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन
पवार पुढे म्हणाले, “आज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सर्व संघटनांनी एकत्र बसून निर्णय घेतला की, या वर्षी दिवाळी साजरी करायची नाही. कारण गेल्या महिनाभरात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्याचं सर्वस्व म्हणजे त्याची शेतीच. तीच नष्ट झाली आहे, तर तो दिवाळी कशी साजरी करणार? म्हणून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला.”
पवार म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते की, संकटाच्या काळात लोकांना मदत करावी. पण सरकारने जाहीर केलेली मदतीची रक्कम तोकडी आहे. नुकसानीचं स्वरूप पाहता या रकमेने शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहता येणं शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल नाराजी वाढत आहे. हे जे काही घडतंय ते अत्यंत दुःखद आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाबाबतही भूमिका मांडली. “मोबदला हा मुख्य मुद्दा नाही. काही शेतकरी विमानतळाची जागा बदलण्याची मागणी करत आहेत. हा निर्णय माझ्या किंवा राज्य सरकारच्या हाती नाही, तो केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. मात्र, विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे, त्यांना योग्य नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन देणे आवश्यक आहे. कोणीही शेतकऱ्यांची जमीन बळकावू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“मी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे की, या विषयावर लोकांच्या उपस्थितीत चर्चा करून तोडगा काढावा. दिवाळी संपल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा करीन,” असे शरद पवारांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या “काळी दिवाळी”च्या निर्णयामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने शेतकरी नाराज असून, विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.