NCP Ajit Pawar group attacks Municipal Corporation : निकृष्ठ काम, बोगस बिले आणि अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
Nagpur : शहरातील उद्यानांतील भ्रष्टाचार आणि निकृष्ठ दर्जाच्या कामांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) महानगरपालिकेवर धडक दिली. पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपायुक्त गणेश राठोड यांना निवेदन दिले. या निवेदनात कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे ठोस पुरावे सादर करत महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार प्रहार करण्यात आला.
राष्ट्रवादीने महापालिका प्रशासनाला दोन आठवड्यांचा अल्टिमेटम दिला. कारवाई करा नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. शहरातील उद्यांनांमध्ये बसवण्यात आलेले ग्रीन जीमचे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. हे साहित्य काहीच दिवसांत तुटले आणि गंजले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या नावाखाली बोगस बिले पास करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Sampada Munde suicide case : खाकी वर्दीतील वासनांध गिधाडं अन् भ्रष्टाचारानं बरबटलेली व्यवस्था !
सुरक्षा रक्षकांची नेमणूक उद्यांनामध्ये नसणे ही बाब गंभीर आहे. सुरक्षा रक्षकांच्या अभावी महिला आणि ज्येष्ठ नागरिक असुरक्षित वातावरणात व्यायाम करत आहेत. उद्यानांमधील बाके, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव प्रकर्षाने दिसतो आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून फक्त कागदोपत्री कामे करून पैसे लाटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.
निकृष्ट कामांवर आणि बोगस मोजमाप पुस्तकांवर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने एफआयआर दाखल करून त्यांना निलंबित करा. निकृष्ट साहित्य पुरवणाऱ्या कंत्राटदारांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाका आणि निधीचा अपहार करणाऱ्यांकडून दंड आणि व्याजासह पैशांची त्वरित वसुली करावी, या तीन प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आल्या.
Mockery of Democracy : लोकशाही की लूटशाही? निवडणूक नावाच्या नाटकामागचं रहस्यमय, जळजळीत वास्तव !
मनपाचा उद्यान विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. १५ दिवसांत कारवाई झाली नाही, तर आम्ही मनपा मुख्यालयाला टाळे टोकू, असा ईशारा अनिल अहिरकर आणि श्रीकांत शिवणकर यांनी दिला आहे. आंदोलनात महिला अध्यक्ष सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, तानाजी वनवे, बजरंगसिंग परिहार, मुकेश रेवतकर, ब्रह्मानंद मस्के, संदीप सावरकर, अभिदत्त फाले, राजू मिश्रा, मॉंटी गंडेचा, संतोष भुजाडे, राकेश घोसेकर, विवेक वानखेडे आदी सहभागी झाले होते.
 
             
		
