Don’t Run Away from Challenges; Face Them Boldly : गडकरींचा विद्यार्थ्यांना सल्ला, ‘माझ्यावर आईच्या व्यक्तिमत्वाची छाप’
Nagpur प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागतो. पण या अडचणींपासून पळून न जाता, अडचणींचा निधड्या छातीने सामना करा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ज्ञान प्रबोधिनी, निगडी पुणे या संस्थेतील सातवी-आठवीच्या ४६ विद्यार्थ्यांशी शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबरला गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. नेतृत्वकौशल्य, राजकारणातील प्रवेश, बालपण, महामार्गांचे व उड्डाणपुलांचे जाळे, कुटुंबाला वेळ देणे, छंद आदी विषयांवरील प्रश्न विद्यार्थ्यांनी गडकरींना विचारले.
Rupali Vs Rupali : राष्ट्रवादीमध्ये दोन “रुपालीं”मधला संघर्ष चांगलाच पेटला
‘विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत मी तयार झालो. माझ्या आईने खूप चांगले संस्कार केलेत. आईच्या व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडली. आपलं घर सांभाळून देशासाठी काहीतरी करण्याचा विचार आईने, संघ तसेच विद्यार्थी परिषदेने दिला. ‘मनसा सततम् करणीयम्’ हा मंत्र घेऊन गोरगरीब, शेतकरी, मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण काही करू शकतो का, याचा विचार मी करीत असतो. त्याच विचारातून आजवरची कामे केली. समाजातील उपेक्षित, गरीब लोकांना प्रकाशाची वाट दाखविणे आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांना भविष्यात पार पाडायचीच आहे,’ असेही गडकरी म्हणाले.
शिक्षण, क्रीडा, आरोग्य, उद्योग, कृषी अश्या प्रत्येक क्षेत्रात आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करायला हवा. छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनच मोठ्या कामांना सुरुवात होत असते. जात-पात-धर्म न पाळता जनतेची सेवा करायची असते. मी माझ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळतो. महापुरुषांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर नक्कीच उत्तम समाज घडू शकतो, असेही ते म्हणाले.
Satyatacha morcha : राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली !
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वयम् अब जानकर हमको… जगाना देश है अपना’ हे गीत सामूहिकरित्या सादर केले. ज्ञान प्रबोधिनी ही संस्था गेल्या ४० वर्षांपासून शिक्षण, ग्रामविकास, स्त्री शक्ती प्रबोधन, संघटन, संशोधन, उद्योग, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, युवक युवतींचे संघटन या क्षेत्रात कार्यरत आहे. ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्रामध्ये शिशू वर्ग ते १० वी पर्यंत दोन हजाराहून अधिक विद्यार्थी औपचारिक शिक्षणासोबत नियमित अनुभव शिक्षणही घेत आहेत, हे विशेष.








