Sand mafia exposed; the administration faces embarrassment : अमरावती आयुक्त पथकाची बुलढाण्यात धडक कारवाई
Buldhana अवैध रेती उत्खनन रोखण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची जाहीर कबुलीच अमरावती आयुक्त पथकाच्या धाडीतून मिळाली आहे. सततच्या कारवाया करूनही रेतीमाफियांचे धाडस कमी न झाल्याने अमरावती आयुक्तांच्या विशेष पथकाने देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बुद्रुक येथे अचानक छापे टाकत तब्बल १ कोटी ५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध अंढेरा पोलिसात गुन्हे दाखल झाले असून जिल्हा प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दुपारी २ ते सायं. ४ दरम्यान फक्त दोन तासांत केलेल्या या कारवाईत १ जेसीबी, ८ टिप्पर (काही विना क्रमांक), ३०+ ब्रास रेती, असे मोठे साठे जप्त करण्यात आले. प्रमुख आरोपी उमेश आत्माराम पहाड,धनंजय नारायण मिसाळ, रवींद्र भास्कर लाड, भरत संजय पहाड या चौघांविरुद्ध BNS कलम ३०३(२), ४८(७), ४८(८), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत गुन्हे दाखल.
CM Devendra Fadnavis : कापूस खरेदी मर्यादा वाढविण्यास तत्त्वतः सहमती!
महसूल विभागाने वेळोवेळी दंड आकारून कारवाया केल्या असूनही तस्करी सुरूच होती. परिस्थिती इतकी बिघडली की तक्रारी वाढत गेल्या आणि अखेर अमरावती आयुक्तांनाच सरळ धडक कारवाई करावी लागली— हीच बाब जिल्हा प्रशासनाची नामुष्की ठरली आहे.
अवैध उत्खनन थांबवण्यात गंभीर दुर्लक्ष आणि जबाबदारी न पाळल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी देऊळगाव महीचे मंडळ अधिकारी काशीनाथ ईप्पर आणि डीग्रसचे तलाठी के. एल. खरात यांना तात्काळ निलंबित केले.
विशेष म्हणजे आयुक्तांच्या धाडीनंतर इप्पर यांनी अंढेरा पोलिसात स्वतः तक्रार दिली, पण काही तासांतच त्यांच्याच हाती निलंबनाचे आदेश वरिष्ठांना माहिती न देणे, उत्खनन थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई न करणे— ही गंभीर कमतरता आढळून आली.
Vanchit Bahujan Aghadi : खुले नाट्यगृह विकासासाठी १० कोटींच्या निधीची मागणी
अमरावती आयुक्तांच्या पथकाने केलेल्या अप्रत्याशित धाडीने महसूल विभाग, खनिकर्म विभाग, देऊळगाव राजा तहसील कार्यालय या सर्वच प्रणालींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. रेतीमाफियांच्या ‘राजरोस’ कारवाया थांबवण्यात स्थानिक प्रशासन कसे अपयशी ठरले?— हा मुद्दा आता जिल्हाभरात चर्चेत आहे.








