Picture clear on alliance with Pawar faction in Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेतील पवार गटासोबतच्या युतीवर चित्र स्पष्ट
Mumbai : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबतच असून जागावाटपाचा विषय जवळपास पूर्ण झाला आहे. आमच्याकडून हा विषय संपवण्यात आला आहे, असं ठामपणे सांगत राऊत यांनी युतीबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्ष युती आणि आघाड्यांच्या गणितात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र लढणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शरद पवार गटासोबत युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, असा प्रश्न विचारण्यात आला असता राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडल्या आहेत, बहुसंख्य जागांवर समन्वय झाला आहे, म्हणजेच युती झालेली आहे. घोषणा करण्याचा आग्रह का धरला जातो, हा प्रश्न राष्ट्रवादीला विचारावा, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Municipal election : विधानसभेत चालते, पण मुंबई महापालिकेत नाही?
याच वेळी संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीचेही स्वागत केले. वंचित आमच्यासोबत नसली तरी जर ती भाजपला रोखण्यास आणि त्यांचा पराभव करण्यास मदत करत असेल, तर आम्ही नतद्रष्ट नाही. भाजपविरोधात जे कोणी उभे राहतील, त्यांचे स्वागतच आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत, यावर बोलताना राऊत म्हणाले की, जेव्हा दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, तेव्हा काही जागा जातात आणि त्यामुळे काही इच्छुक नेते अस्वस्थ होतात. ही बाब सर्वच पक्षांमध्ये असते, भाजपमध्येही आणि शिंदे गटातही. अजित पवार यासाठीच स्वतंत्र लढत आहेत. मात्र, कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं ऐकतील. ज्यांना अन्याय झाल्याची भावना वाटते, त्यांना राग व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण त्यातून मोठं बंड उभं राहिलेलं दिसत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. काही जण याला बंड म्हणत असतील तर बंडाची व्याख्या आधी समजून घ्यावी. १८५७ चं बंड देशासाठी होतं, इथलं चित्र तसं नाही. ज्या पक्षाने ४० वर्ष दिलं, तो एखाद्या वेळी काही देऊ शकत नसेल, तर कोणी वेगळा निर्णय घेतला, याला बंड म्हणता येत नाही. शिंदे गट बंड केल्याचं सांगतो, पण ते तिथे जाऊन बूट चाटत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
युतीबाबत शेवटी भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीला ज्या जागा हव्या होत्या, त्यातील बहुसंख्य जागा आम्ही दिल्या आहेत. काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या असून त्याबाबत आम्ही राष्ट्रवादीला राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितलं आहे. आमच्याकडून युतीचा विषय पूर्ण झाला असून आता त्यावर अनावश्यक चर्चा करण्यात अर्थ नाही, असं ठाम मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.








