Vanchit Aghadi Goes Solo in Akola, Snubs Congress : काँग्रेसकडे पाठ फिरवत दुसरी उमेदवार यादी तयार
Akola अकोल्याच्या राजकारणात अखेर वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेससोबत संभाव्य आघाडीबाबत झालेल्या चर्चा, बैठका व मध्यस्थीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर वंचितने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ३४ उमेदवारांची दुसरी यादी तयार केली आहे. उशिरा रात्रीपर्यंत या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून, युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अकोल्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत खलबते सुरू होती. वंचितकडून सातत्याने संवादाचे संकेत देण्यात आले, बैठका झाल्या आणि नेत्यांमध्ये चर्चा रंगल्या. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव सादर झाला नाही, तसेच अधिकृत प्रतिसादही मिळाला नसल्याचा आरोप वंचितच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखेर संयम सोडत वंचितने स्वतंत्र उमेदवारांची यादी तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Amravati Municipal Corporation Election : अमरावतीत महापरिश्रमानंतर महायुतीवर शिक्कामोर्तब
‘आम्ही बराच काळ थांबलो, वाट पाहिली; मात्र सन्मानजनक चर्चा झालीच नाही,’ अशी नाराजी वंचित नेत्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत होती आणि त्याचा संघटनात्मक ताकदीवर परिणाम होऊ नये, म्हणून स्वतंत्र लढ्याचा मार्ग स्वीकारल्याचेही वंचितकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्रस्ताव देणे तर दूरच, साधा संवादही साधला गेला नसल्याचा आरोप वंचितकडून करण्यात येत आहे. ‘स्वाभिमानाची लढाई’ म्हणून वंचितने अकोल्यात एकहाती निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, येणाऱ्या काळात ही लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
PMC election : भाजपचा धाडसी प्रयोग; तरुण आणि महिलांना प्राधान्य
एकूणच, अकोल्यात वंचितचा ‘एकला चलो रे’ निर्णय केवळ उमेदवारीपुरता मर्यादित नसून, तो महाविकास आघाडीतील विसंवाद, अहंकार आणि दुर्लक्ष यावरचा थेट राजकीय आरोप मानला जात आहे. वंचितच्या या निर्णयामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून, विरोधकांच्या गोटात समाधानाचे वातावरण असल्याचेही बोलले जात आहे. ‘वंचित आणि काँग्रेस एकत्र आले असते, तर समीकरण अधिक अवघड झाले असते,’ अशी कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. अखेर या निर्णयाचा निकाल मतदारांच्या हातात असून, तो कोणाच्या बाजूने झुकतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.








