Local Body Elections : काँग्रेस–शिंदेसेना बलाढ्य असूनही सत्तेची चावी तिसऱ्याच हातात!

Congress–Shinde Sena strong, yet power key with a third force : बहुमत कुणाकडेच नाही; मेहकरमध्ये ‘किंगमेकर’ राजकारण रंगात!

Mehkar तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. निकाल केवळ अनपेक्षित नव्हते, तर दीर्घकाळ जुळून आलेली राजकीय समीकरणेच बदलणारे ठरले. मोठ्या पक्षांना संख्याबळ मिळाले, पण सत्तेची किल्ली मात्र त्यांच्या हातात राहिली नाही.

शिंदेसेना आणि काँग्रेससारख्या पारंपरिक व बलाढ्य पक्षांनी तुलनेने जास्त नगरसेवक निवडून आणले; मात्र असे असतानाही नगराध्यक्ष पद उद्धवसेनेच्या उमेदवाराने पटकावले. विशेष म्हणजे परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे.

या निकालांनंतर मेहकर नगरपरिषदेचे राजकारण अनिश्चिततेच्या वळणावर उभे राहिले आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — स्थिर सत्ता कोण उभी करणार? निवडणुकीत आमनेसामने असलेले काँग्रेस आणि उद्धवसेना आता सत्तेसाठी हातमिळवणी करतील का? की ‘विकास’ या मुद्द्यावर शिंदेसेना निर्णायक भूमिका बजावणार?

Akola Municipal Corporation Elections : आईसाठी उमेदवारी मागितली, नंतर घेतला मोठा निर्णय

मेहकरच्या जागरूक मतदारांनी कोणालाही पूर्ण बहुमत न देता संतुलित निकाल दिला आहे.

काँग्रेस : ११ नगरसेवक – सर्वाधिक संख्याबळ

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष (शिंदेसेना) : ९ नगरसेवक
उद्धवसेना : नगराध्यक्ष पद मिळाले, मात्र नगरसेवकांची संख्या तुलनेने कमी
यामुळे सत्तेचा तोल कुठल्याही क्षणी बदलू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांनी काँग्रेसवर केलेले तीव्र आरोप अद्याप मतदारांच्या स्मरणात आहेत. मात्र निकाल जाहीर होताच काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

काँग्रेस नेते कासम गवळी यांच्या निवासस्थानी आमदार सिद्धार्थ खरात व नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यात झालेल्या भेटीमुळे चर्चांना अधिकच उधाण आले. तथापि, काँग्रेसकडून उद्धवसेनेला थेट पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर हे दीर्घकाळापासून या भागात जनाधार राखून आहेत. विकासाला प्राधान्य देत मेहकरच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने किंगमेकरची भूमिका शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Amravati Municipal Corporation Election : काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्याचा भाजपवर आरोप

अतिक्रमण, पायाभूत सुविधा, पाणी व नागरी समस्यांनी ग्रासलेल्या मेहकर शहराला आता स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची नितांत गरज आहे. नगरपरिषदेत बहुमत कुणाला मिळणार? कोण किंगमेकर ठरणार? नव्या वर्षात मेहकरवर कोणाचा राजकीय झेंडा फडकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार असून, मेहकरचे राजकारण सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.