Bmc election : ठाकरे बंधूंच्या एकत्रित मुलाखतीचा टीझर प्रदर्शित!

Need love for state – Uddhav, plot to separate Mumbai- Raj Thackeray : राज्यावर प्रेम हवे – उद्धव, मुंबई वेगळी करण्याचे डाव – राज ठाकरे

Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत येत्या 8 आणि 9 जानेवारी रोजी प्रकाशित होणार असून, त्याआधी या मुलाखतीचा पहिला टीझर समोर आला आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या टीझरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जवळपास दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र दिसत असल्याने या मुलाखतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टीझरमध्ये उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना राज्यकर्त्याचे प्रेम हे सत्तेवर नव्हे तर राज्यावर असले पाहिजे, असे स्पष्टपणे सांगताना दिसतात. तर राज ठाकरे मुंबईच्या प्रश्नांवर भाष्य करताना, मुंबईतील समस्या समजून घ्यायच्या असतील तर मुंबईत जन्माला यावे लागते, असे ठामपणे म्हणतात. या मुलाखतीत संजय राऊत ठाकरे बंधूंना थेट प्रश्न विचारताना दिसतात की महाराष्ट्राला तुम्ही एकत्र येण्यासाठी तब्बल 20 वर्षे का वाट पाहावी लागली.

Pravin Pote : भाजप-युवा स्वाभिमानमध्ये ‘जुंपली’; भाजपने फेटाळला ‘मैत्रीपूर्ण’ लढतीचा दावा

या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर दावा करतात. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचा इशाराही ते देतात. टीझरमध्ये ठाकरे बंधू सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिकेत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उपस्थित केलेले मुद्देही चर्चेचा विषय ठरले आहेत. साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी आणि ढासळत चाललेली शिस्त यावर संताप व्यक्त करत, मुंबईकर म्हणून आता घराबाहेर पडताना लाज वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत असल्याची खंतही त्यांनी मांडली.

Municipal elections : भाजप – एमआयएम युतीचा राजकीय स्फोट, ‘पार्टी विथ डिफरंस’चा दावा ?

यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे मुंबई खराब व्हायला वेळ लागला, मात्र पुणे लवकरात लवकर बरबाद होईल, असा इशाराही देतात. बिनविरोध निवडणुकांवर भाष्य करताना महेश मांजरेकर ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून येतात, तिथे लोकं बोटावर शाई कशी दाखवणार, असा सवाल उपस्थित करतात. यावर वाटलेल्या नोटांमुळेच हे सगळं घडत असल्याची टीका ठाकरे बंधू करताना टीझरमध्ये दिसून येते.

या मुलाखतीच्या टीझरनंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे बंधू आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच होता, बाकी सगळे संपले आहेत, कार्यकर्ते त्यांच्या मागे नाहीत, उमेदवार मिळत नाहीत, असा दावा निलेश राणे यांनी केला. बोलायला लागलो तर कपडेही राहणार नाहीत, असा इशारा देत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पालिकांमध्ये कोणी, कुठे आणि किती भ्रष्टाचार केला हे उघड करू, असेही त्यांनी सांगितले.

Ravi Rana : भाजप आमचा ‘मोठा भाऊ’, अमरावतीत ‘फ्रेंडली फाईट’ची रणनीती

संजय राऊत कधी लोकांमधून निवडून आले आहेत का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याआधी स्वतःचे सामाजिक काम दाखवावे, अशी खोचक टिप्पणी केली. ठाकरे बंधूंची एक्सपायरी डेट जवळ आली असून येणाऱ्या पालिका निवडणुकांत ते स्पष्ट दिसेल, असा दावाही निलेश राणे यांनी केला. मराठी माणसाला देशोधडीला लावणारे आणि मुंबईबाहेर हद्दपार करणारे नेते म्हणून त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मुलाखतीचा संपूर्ण मजकूर समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

__