uddhav-thackeray-direct-talks-with-congress-high-command-for-rajya-sabha-election-maharashtra : शरद पवार गटाला वगळून थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा
Mumbai : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडशी चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे या चर्चांमध्ये शरद पवार यांच्या गटाला औपचारिकरीत्या सहभागी करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजयासाठी एका उमेदवाराला २७ मतांचा कोटा आवश्यक असणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीकडे सुमारे ५० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे किमान एक जागा जिंकण्याची शक्यता आघाडीसमोर आहे. मात्र त्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार, यावरून आघाडीत चर्चा आणि मतभेद वाढल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये केवळ राज्यसभेपुरतेच नव्हे तर आगामी विधान परिषद निवडणुकांबाबतही प्राथमिक चर्चा झाली आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार असून त्या निवडणुकीत एका उमेदवाराला २९ मतांचा कोटा आवश्यक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य जागावाटप आणि उमेदवारांबाबत रणनीती आखली जात असल्याचे समजते.
Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली
दरम्यान, ज्या सात राज्यसभा जागांसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये शरद पवार यांची जागाही रिक्त होत आहे. ते पुन्हा राज्यसभेत जाणार की पक्ष नव्या चेहऱ्याला संधी देणार, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पुढील रणनीती काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
AI Summit in Delhi 2026 : नागपुरात भाजयुमो विरुद्ध युवक काँग्रेस आमनेसामने!
विधानसभेतील विद्यमान संख्याबळ पाहता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सातपैकी सहा जागा महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्यानंतर आघाडीतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.
___








