Akola-washim-district-cooperative-bank-director-elections-on-march29 : अकोला–वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी २९ मार्चला मतदान
Akola राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या माध्यमातून अकोला–वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या २१ संचालक पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज, सोमवार, २३ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, २९ मार्च रोजी मतदान होईल. अकोला वाशिम जिल्ह्यातील सरकारने ते या निवडणुकीत आपले भाग्य आजमावणार आहेत.
अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र असलेल्या बँकेच्या संचालक पदांसाठी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जांची छाननी २ मार्च रोजी होणार आहे. १८ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असून, २० मार्च रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. २९ मार्चला मतदान आणि ३० मार्चला मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
Youth Congress : मेळघाटात युवक काँग्रेसची ‘मनरेगा बचाव यात्रा’
अकोला–वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांसाठी अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विशेष कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या १३ मतदारसंघांत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर तसेच वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा तालुक्यांचा समावेश आहे.
याशिवाय प्रवर्गनिहाय आठ मतदारसंघ ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती (१), इतर मागासवर्गीय (१), भटक्या जाती-विमुक्त जमाती व विशेष मागासवर्ग (१), महिला प्रतिनिधी (२), कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या व जिल्हा सहकारी बोर्ड (१), औद्योगिक मजूर व विणकर संस्था (१) तसेच पगारदार नोकरदारांच्या पतसंस्था, नागरी सहकारी बँका, ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व इतर सभासद मतदारसंघ (१) यांचा समावेश आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने अकोला–वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांच्या निवडणुकीसाठी वाशिम येथील जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) गितेशचंद्र साबळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Money showered : अकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील राजकारण सांभाळणारे शीर्षस्थ नेतृत्व म्हणून डॉक्टर संतोष कुमार कोरपे यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणूक होणार असून त्यांच्यासोबत रमेश हिंगणकर, सुभाषचंद्र कोरपे व इतर नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाने ही कंबर कसली आहे.








