Bacchu-kadu-welcomed-farmers-loan-waiver-decision-cm-devendra-fadnavis : अटींवर नोंदवला आक्षेप, आंदोलनावर टिका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणार
Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करताना प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही अटींवर आक्षेप नोंदवला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी ५० हजार रुपयांची मदत अपुरी असून त्यांना किमान दीड लाख रुपये दिले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या विषयावर सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठकही बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही महिन्यांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले होते. त्यावेळी सरकारने मध्यस्थी करत जून २०२६ पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मुदत दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली.
या घोषणेनुसार, सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत कर्ज फेडू न शकलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारकडून माफ करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेले आश्वासन सरकारने अर्थसंकल्पात पूर्ण केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र या योजनेत काही त्रुटी असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र या योजनेत काही त्रुटी आहेत. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या चालू कर्जदारांनाही यातून दिलासा मिळायला हवा होता. तसेच जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरतात, त्यांना केवळ ५० हजार रुपये देणे अन्यायकारक आहे. त्यांना किमान दीड लाख रुपये दिले गेले, तरच खऱ्या अर्थाने समतोल राखला जाईल.”
मुंबईत झालेल्या कर्जमाफी आंदोलनाचा उल्लेख करत बच्चू कडू म्हणाले, “आम्ही जेव्हा कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन केले, तेव्हा आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आज त्या टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. कर्जमाफी देण्यापासून दूर पळणाऱ्या सरकारला ही घोषणा करायला आम्ही भाग पाडले,” असा दावा त्यांनी केला.
Rajya sabha election : राज्यसभेच्या जागेवरून मविआमध्ये खळबळ, आदित्य ठाकरे नाराज
कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी येत्या १४ किंवा १५ तारखेला शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.








