व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Jal jeevan Mission : मेळघाटात जलजीवन मिशन योजनेत १०० कोटींचा भ्रष्टाचार?

Jal jeevan Mission : मेळघाटात जलजीवन मिशन योजनेत १०० कोटींचा भ्रष्टाचार?

allegations of 100 crores corruption in Melghat Jal Jeevan mission : युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे आरोप; केंद्रीय समितीमार्फत चौकशीची मागणी

Amravati मेळघाटातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ योजनेत १०० कोटी रुपयांहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे. पंतप्रधानांची ‘हर घर नल, हर घर जल’ ही संकल्पना मेळघाटात प्रभावीपणे राबवली गेली नसल्याचे सांगत, संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

धारणी व चिखलदरा तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आजही आदिवासी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कोट्यवधींचा खर्च झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप आहे. खटकाली, मेनघाट व गरजधारी परिसरात पाइपलाइन खोदकाम कागदोपत्री दाखवून निधी काढण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाइपलाइन जमिनीवरच टाकण्यात आल्याचे चित्र दिसून येते. तसेच अंदाजपत्रकात दोन मोटरपंप दाखवून प्रत्यक्षात एकच बसवण्यात आल्याचेही प्रकार समोर आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Lonar taluka general meeting : कामे प्रलंबित राहिली तर याद राखा, आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावले

जुन्या टाक्यांवर रंगरंगोटी, कामांचा दर्जा संशयास्पद

चिलाटी येथील २०१२-१३ मध्ये बांधलेली जुनी पाण्याची टाकी सध्या गळकी व धोकादायक स्थितीत आहे. मात्र, तिच्यावर केवळ रंगरंगोटी करून ‘२०२२-२३’ अशी नोंद करून निधी काढण्यात आल्याचा आरोप आहे. सुमिता गावातही अशाच प्रकारे जुन्या टाक्यांवर रंग देऊन बिले सादर करण्यात आल्याचे सांगितले जाते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरवारखेडा, रुईपठार, कुही, सिमोरी व चोबिता या गावांमध्येही दुरुस्तीची कामे केल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात नळाला पाणी येत नसल्याने महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. टंचाई निवारणाच्या नावाखाली मोटरपंप बसवणे, बोअरवेल व विहिरींची दुरुस्ती न करता निधी अपहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Krupal tumane : शिंदेसेनेने तुमाने यांचा नागपूर-रामटेकशी ‘संपर्क’ तोडला; संजय निरुपम नागपूरचे संपर्कप्रमुख

३०-४० गावांतील योजना ठप्प; आंदोलनाचा इशारा

धारणी, चिखलदरा, हतरू व चुर्णी परिसरातील सुमारे ३० ते ४० गावांमधील ८० टक्के पाणीपुरवठा योजना सध्या बंद अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र ‘शोले’ शैलीतील आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहुल येवले यांनी दिला आहे.

error: Content is protected !!