व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र LPG crisis : गॅस सिलिंडरच्या लाईनमध्ये उभे असताना मृत्यूची अफवा खोटी

LPG crisis : गॅस सिलिंडरच्या लाईनमध्ये उभे असताना मृत्यूची अफवा खोटी

Rumour of death while standing in a Gas Cylinder queue turns out to be false : माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण

Akola तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या ‘गॅस सिलिंडरसाठी लाईनमध्ये उभे असताना मृत्यू’ या दाव्याला प्रशासनाने फेटाळून लावले आहे. संबंधित घटनेबाबत प्राप्त अहवाल आणि CCTV फुटेजच्या आधारे ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.
२८ मार्च २०२६ रोजी शंकरराव शिरसाट हे गॅस एजन्सी परिसरात आले होते. मात्र, ते ग्राहकांच्या लाईनमध्ये उभे असल्याचे कुठेही दिसून येत नाही. CCTV फुटेजमध्ये ते एजन्सीच्या पायरीजवळ थांबलेले दिसतात. त्यानंतर त्यांनी आपल्या डोक्यावरचा दुपट्टा काढला आणि काही वेळातच ते कोसळल्याचे दिसून येते. त्या वेळी एजन्सीजवळ काही नागरिक उपस्थित होते.

तहसील कार्यालयाकडून प्राप्त प्राथमिक अहवालानुसार, शिरसाट यांचा मृत्यू गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहिल्यामुळे झाल्याचा दावा चुकीचा आहे. एजन्सी परिसरात त्या वेळी कोणतीही मोठी गर्दी किंवा लांब रांग नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

new financial year : इनकम टॅक्समध्ये पाच मोठे बदल, आजपासून नवीन कायदे लागू, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

तसेच, शिरसाट यांच्या नावावर स्वतंत्र गॅस कनेक्शन नसून त्यांच्या पत्नीच्या नावावर कनेक्शन नोंद आहे. संबंधित कनेक्शनचे बुकिंग २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले होते आणि २ मार्च रोजी सिलिंडर वितरित झाल्याची नोंद आहे. त्यामुळे घटनेच्या दिवशी ते गॅस घेण्यासाठी आले होते की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे किंवा लाईनमध्ये उभे राहिल्यामुळे मृत्यू झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींमध्ये पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असेही सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!