mva-crisis-thackeray-group-divided-baramati-bypoll-2026 : बारामती पोटनिवडणुकीवरून ठाकरे गटात दोन मतप्रवाह
Mumbai : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून महाविकास आघाडी मध्ये फूट पडण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघ येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा मध्ये दोन स्पष्ट मतप्रवाह समोर आल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा की स्वतंत्र भूमिका घ्यायची, यावरून पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत या विषयावरून नेत्यांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समजते.
Nana patole: महाराष्ट्रात आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
पक्षातील एका गटाचे मत असे आहे की, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. तसेच अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक संबंध लक्षात घेता, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. मात्र दुसऱ्या गटाने याला तीव्र विरोध दर्शवला आहे. महायुतीकडून उमेदवारी असताना त्यांना पाठिंबा देणे म्हणजे पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असल्याचे मत या गटाने मांडले आहे.
याचबरोबर राहुरी विधानसभा मतदारसंघ येथील संभाव्य पोटनिवडणुकीवरूनही मतभेद वाढले आहेत. जर या ठिकाणी आघाडीतील इतर घटकांनी उमेदवार न दिल्यास ठाकरे गटाने स्वतःचा उमेदवार उभा करावा, असा प्रस्तावही पुढे आला आहे. त्यामुळे बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवरून आघाडीतील एकमताचा अभाव स्पष्ट दिसत आहे.
Ashok kharat case : आधी बापाचे कारनामे उघडकीस, आता मुलगाही फरार
दरम्यान, काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत आधीच देण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या संपूर्ण घडामोडींमध्ये अंतिम भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी आघाडी एकसंध असल्याचे स्पष्ट केले आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या पक्षाशी संबंधित असल्याने अंतिम निर्णय त्यांच्याकडूनच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच राहुरीसाठी त्यांच्या पक्षातून तीन जण इच्छुक असूनही, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या निधनाबद्दल सहानुभूती असली तरी निवडणूक बिनविरोध व्हावी, हा अट्टाहास योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मतदारांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि तो हिरावून घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगत त्यांनी निवडणुकीत लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
_








