A soldier on duty suffered a heart attack : मृत्यूने गाठलेच; भामरागड तालुक्यातील घटना
Gadchiroli जिल्ह्यात माओवाद्यांच्या हालचाली वाढल्याने पोलिस अलर्ट मोडवर आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव भामरागड तालुक्यातील कियार- आलापल्ली दरम्यान रोड ओपनिंग करताना १२ फेब्रुवारी रोजी एका विशेष कृती दलातील (सॅग) जवानाला हृदयविकाराचा धक्का आला. सहकाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले नाही.
रवीश मधुमटके (३४) असे त्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. ते जिल्हा पोलिस दलातील विशेष कृती दलात (सॅग) सक्रिय होते. भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील दिरंगी व फुलनार जंगलात ११ फेब्रुवारी रोजी माओवादी व जवानांत चकमक उडाली होती. यात गोळी लागून महेश नागुलवार हे जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे.
माओवाद्यांपासून सुरक्षारक्षकांना धोका पोहोचू नये, यासाठी १२ फेब्रुवारी रोजी विशेष कृती दलाचे जवान कियार- आलापल्ली येथे रोड ओपनिंग करत होते. कोठी पोलिस ठाण्यापासून पाच किलोमीटर अंतर चालल्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंमलदार रवीश मधुमटके यांना अस्वस्थ वाटू लागले.
Chandrashekhar Bawankule : फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवा
सोबतच्या अधिकारी व अंमलदारांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून अंमलदार रवीश मधुमटके यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तीन दिवसांत दोन जवानांच्या जाण्याने पोलिस दल हळहळले आहे.