Notice from fire department to 165 hospitals : १६५ रुग्णालयांना अग्निशमन विभागाकडून नोटीस
Nagpur महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिट्रिना इस्पितळातील अनियमिततांबाबत नाराजी व्यक्त करत १५ दिवसांची चौकशी देण्याचे निर्देश दिले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. बावनकुळेंच्या या कारवाईला गंभीरतेने घेत नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून १६५ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होते. रुग्णालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा व इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर जास्त आहे. त्यामुळे तसेच देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने आग लागण्याचा धोका असतो. रुग्णालयांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट करून त्यासंदर्भात अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला!
पण शहरातील १६५ रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. या रुग्णालयांना नोटीस बजावून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर न केल्यास मार्चपासून इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच वेळ पडल्यास इमारत सीलबंद करण्याचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.
रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीमुळे राज्य शासनाने रुग्णालयांना फायर ऑडिट करणे बंधनकारक केले होते. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार दर सहा महिन्यांनी जानेवारी व जुलैमध्ये अग्नी प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला (फायर ऑडिट) मिळवणे बंधनकारक आहे.
Chandrashekhar Bawankule : फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवा
फायर ऑडिट बंधनकारक असल्याने ज्या रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नसेल, त्या रुग्णालयांना नोटीस पाठवल्या जातात. त्यात रुग्णालयांचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित केला जाईल तर पोलिसांकडून इमारत सीलबंद केली जाऊ शकते. दंडात्मक कारवाईदेखील होऊ शकते. त्यानंतरही प्रमाणपत्र सादर न केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे ३३९ शासकीय, खासगी नोंदणीकृत आरोग्य संस्थांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी फायर ऑडिट झालेल्या ११८ संस्था असून, १६५ रुग्णालयांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.








