Grant will be suspended, if documents not submitted : डिसेंबर, जानेवारीचे अनुदान डीबीटीद्वारे
Nagpur राज्य शासनाच्या श्रावण बाळ निराधार योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचा राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना मोठा आधार आहे. मात्र, निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
योजनांच्या लाभासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यात या दोन्ही योजनांचे जवळपास ३ लाखांवर लाभार्थी आहेत. शासनाने आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतल्याने प्रत्येक लाभार्थ्यांकडून कागदपत्र जमा करण्यास सांगितले आहे.
यासाठी बराच वेळही दिला आहे. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांनी कागदपत्र जमा केलेले नाहीत. डीबीटीद्वारे पैसे जमा करणे सुरू झाले आहे. त्यामुळे जे लाभार्थी आता कागदपत्र जमा करणार नाहीत, त्यांचे फेब्रुवारीचे पैसे अटकण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ३ लाखांवर लाभार्थी आहेत. शहराचा विचार केला तर ७५ हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत ६७ टक्के लोकांनी कागदपत्र जमा केलेले आहेत. उर्वरितांचे अनुदान लटकण्याची शक्यता आहे.
डिसेंबर, जानेवारी महिन्याचे अनुदानसुद्धा डीबीटी पद्धतीने वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार डीबीटी पोर्टलवर नोंद झालेल्या व आधार कार्ड अपडेट असलेल्या व बँकेत लिंक असलेल्या लाभार्थ्यांना थेट खात्यात लाभ वितरण होईल. मात्र, जे लाभार्थी ही प्रक्रिया करणार नाहीत, त्यांची अडचण होईल.