56th death anniversary of Rashtrasant Shri Tukdoji Maharaj : खासदार अमर काळे यांनी सांगितले ग्रामगीतेचे महत्त्व
Wardha राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता मानवी जीवनाला शिकवण देणारी आहे. त्यातील विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांची कास धरावी, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने तळेगांव येथे खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ५६ वा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला. तसेच ब्रह्मलीन गुरुवर्य ग्रामगीतादास रामकृष्ण अत्रे महाराज स्मरणार्थ खंजिरी भजन स्पर्धा ग्रामपंचायतच्या प्रागंणात पार पडली. याप्रसंगी प्रमुख अतिथी खासदार अमर काळे, सुधीर दिवे, डॉ. हेमंत ठाकरे, मराठा शिक्षण संस्था अध्यक्ष दिलीप निंभोरकर, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आशिष खंडागळे आदींची उपस्थिती होती.
१९४२ मध्ये आष्टी-चिमूर रणसंग्रामामध्ये आष्टी येथील पंचीगोंड, शहीद हरिलाल कहार, रशीद खान नवाब, डॉ. गोविंदराव मालपे, उदेभान कुबडे आदी शहीद वीरांनी प्राणाची आहुती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. पण, आता त्यांचे विस्मरण होत आहे. अशी खंत खासदारांनी व्यक्त केली.
दिवंगत खासदार नानाजी उर्फ जगजीवनराव कदम यांच्यानंतर आर्वी विधानसभेला तब्बल ५३ वर्षांनंतर हा योग आला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संसदेत जाण्याची संधी मिळाली. हे आपणा सर्वांचे श्रेय आहे, या शब्दांत खासदार काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Yavatmal District Central Cooperative Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय भूकंप होणार ?
खंजेरी भजन स्पर्धेत शहरी पुरुष गटात आदर्श भजन मंडळ निमगव्हाण, सार्थक भजन मंडळ हुसनापूर, राष्ट्रसंत भजन मंडळ जुनोना हे प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे राहिले. ग्रामीण पुरुष गटात अ. भा. गुरुदेव सेवा भजन मंडळ रिधोरा, ग्रामनाथ गुरुदेव सेवा भजन मंडळ बोरगावं (मेघे), जगन्नाथ महाराज गुरुदेव सेवा भजन मंडळ पिंपळखेडा अनुक्रमे राहिले. तर, महिला गटात प्रथम क्रमांक संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरा नगर चंद्रपूर, द्वितीय गुरुमाऊली महिला भजन मंडळ काटोल, तर तृतीय क्रमांक ओम जयभारती महिला भजन मंडळ, दक्षिण नागपूर यांना मिळाला.