A minister accused of abusing a woman : जयकुमार गोरेंवर महिला अत्याचाराचा आरोप
Mumbai : महायुतीच्या राज्य मंत्रीमंडळातील एकापाठोपाठ एक मंत्र्यांवर विविध आरोप आहेत. याच साखळीत आता भाजपचे नेते व मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे राज्य मंत्रीमंडळातील आणखी एका मंत्र्याचे वस्त्रहरण होत असल्याचे समोर आले आहे.
राज्य मत्रीमंडळातील धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना खोटी माहिती देऊन सदनिका गिळंकृत केल्याच्या आरोपावरून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आता पुन्हा एका मंत्र्यांवर आरोपाची राळ उठली आहे. मूळचे काँग्रेसचे असलेले सांगली जिल्ह्यातील जयकुमार गोरे काही वर्षांपूर्वी भाजपवासी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू मानले जातात. त्यांच्यावर आता मोहिते घराण्यातील एका महिलेने छळाचा आरोप केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती असलेले हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील या महिला असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाची गोष्ट करणाऱ्या राज्य सरकारसाठी ही मोठीच काळिमा फासणारी घटना आहे. जयकुमार गोरे यांनी मोहिते घराण्यातील एका महिलेला अश्लिल छायाचित्रे पाठविल्याचा आरोप आहे. जयकुमार गोरे यांनी विवस्त्र छायाचित्रे महिलेला पाठविल्याचा आरोप केला जात आहे.
यापूर्वी महिलांचे विनयभंग करण्याचे आरोप गोरे यांच्यावर २०१६ मध्ये सुद्धा झाले होते. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जयकुमार गोरे हे महिला अत्याचार करणाऱ्यांमधील सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षाने हा मुद्या उचलला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
Anil Deshmukh : गृहमंत्र्यांना या व्हिडिओची माहिती अगोदरच होती !
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील या महिला आहेत. हा महाराष्ट्राच्या सन्मानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ गोरे यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या पीडित महिलेने विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मुंडे, कोकाटे यांच्यानंतर आता जयकुमार गोरे प्रकरण राज्य सरकारसाठी कठीण जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे.