Breaking

Nana Patole : एकनाथ शिंदेंच्या विरोधात मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र

Chief Secretary’s affidavit against Eknath Shinde : काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा; कोरटकर-सोलापूरकर सरकारच्या पदराखाली

Mumbai यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणात नगरविकास खात्याकडून अवैधरित्या दिलेल्या निधीला तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाच्या कामाचे पैसे नगरविकास खात्याने थेट पैसे कंत्राटदाराला दिल्याचा आरोप केला जात आहे. ही रक्कम ५४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पुरवठादार, कंत्राटदार व जीवन प्राधिकरण असा त्रिपक्षीय करार झाला होता. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड होते. जीवन प्राधिकरणाने जुन्या पाईपलाईन बदलल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई कंत्राटदाराकडून वसूल करणे अपेक्षित होते. परंतु संजय राठोड यांनी ही रक्कम नगरविकास खात्याने देण्याचे निर्देश दिले.

या आदेशाला तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. या प्रकरणाच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. यावेळी मुख्य सचिवांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती, असे म्हटले आहे. या प्रकरणावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणार्या या सरकारचा या प्रतिज्ञा पत्राने पर्दाफाश झाले. राज्याच्या एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

सोलापूरकर, कोरटकरवर सरकारची कृपा

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, असे आव्हान ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहे. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान केला तर ते आपल्याच परिवारातील असल्याने त्यांना पदराखाली घेतल्याचा आरोप पटोले यांनी केला.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार हे संविधानाला मानत नाही, ते धर्माच्या आधारावर भूमिका घेऊन कारवाई करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात इतिहासातील काही घटनांचा उल्लेख केला पण आज वर्तमानात जे घडले आहे त्याचा विचार मुख्यमंत्री का करत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारावई करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींचे समर्थन सत्ताधारी भाजपा आमदार करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत अधिवेशन चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे पण गोंधळ घालणाऱ्या पक्षाचे हे ‘गोंधळी सरकार’ आहे, असेही नाना पटोले म्हणाले.