Two police officers suspended in farmer assault case : ठाणेदार निलंबित; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
Wardha खरांगणा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोरगाव (गोंडी) येथे एका शेतकऱ्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी पीडित शेतकरी तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला असता त्यांना योग्य वागणूक न देता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. हे प्रकरण आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उचलून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यामुळे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी तातडीने खरांगण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना निलंबित करून मुख्यालयी पाठवले.
नारायण गोमाजी कौरती (वय ६५, रा. बोरगाव गोंडी) हे शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी शेतात झाडाखाली आराम करीत होते. त्यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण यांच्यासह अनिल गजानन काळे, गोविंद बाबूराव चंद्रवंशी, दुर्गादास दादाराव अंभोरे हे तेथे पोहोचले. त्यांनी जंगलात आग लावल्याच्या संशयातून नारायण कौरती यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांना वाहनात बसवून धानोलीच्या जंगलात रात्रभर फिरविले. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना गावात आणून सोडले.
Water department : पाणीपट्टी त्रुटींविरोधात आंदोलनाचा Impact; संयुक्त बैठक होणार
याप्रकरणी शनिवारी शेतकरी खरांगणा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना अयोग्य वागणूक देऊन मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. शेवटी प्रकरण पोलिस अधीक्षंकापर्यंत पोहोचल्यावर गुन्हा दाखल झाला आणि सभागृहात पोहोचताच ठाणेदारांना निलंबित करण्यात आले. पण, अद्यापही वनविभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेतकरी नारायण कौरती यांचा मुलगा भारतीय सेनेत असून, त्याला या प्रकरणाची माहिती मिळताच त्याने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांस कळविले. त्यांनी लगेच पोलिस अधीक्षकांना ही बाब लक्षात आणून दिल्यावर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी ठाणेदारांना निर्देश देताच दोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार सुमित वानखेडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. ‘शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला केवळ संशयाच्या आधारे भर उन्हात मारहाण करणे ही लोकशाहीत न पटणारी बाब आहे.
पोलिसात तक्रार द्यायला गेले असता त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही. मद्यधुंद असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय परीक्षणही झाले नाही. जो मुलगा देशाचे रक्षण करतो, परंतु त्याचे आई-वडील असुरक्षित आहेत!’ अशी भूमिका मांडली. परिणामी ठोणदारांना निलंबित करण्यात आले.
Uddhavsaheb Balasaheb Thackeray Shivsena : सोयाबीन खरेदीत अनियमितता; शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!
शेतकऱ्याच्या शेतात जाऊन कारण नसताना बेदम मारहाण करणे व रात्रभर जंगलात फिरवण्याच्या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण यांच्यासह वन कर्मचारी अनिल गजानन काळे, गोविंद बाबूराव चंद्रवंशी, दुर्गादास दादाराव अंभोरे यांच्या विरुद्ध खरांगणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या चौघांनाही आता निलंबित केल्याचे उपवनसंरक्षक मंगेश ठेंगडी यांनी सांगितले.