Breaking

Mehkar Municipal Council : अतिक्रमण कारवाई सुरू असताना रेकॉर्ड रुमला आग!

 

Fire breaks out in record room : मेहकर नगरपरिषदेतील घटना संशयास्पद; हजारो कागदपत्रे भस्मसात

Buldhana मेहकर शहरातील नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रूमला शनिवार, दि. ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास संशयास्पद आग लागली. अतिक्रमणविरोधी कारवाई जोरात सुरू असतानाच ही घटना घडल्याने आगीबाबत संशय अधिकच गडद झाला आहे. या आगीत नगरपरिषदेची मालमत्तेसंबंधीची तसेच नागरिकांची हजारो महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग अधिक भडकत गेली. यानंतर पोलिस, अग्निशमन दल आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मेहकर नगरपरिषदेचा मुख्य अग्निशमन बंब तांत्रिक बिघाडामुळे कार्यरत नसल्याने, लोणार नगरपरिषदेचा अग्निशमन बंब मागवण्यात आला. तसेच मेहकरचा छोटा बंब घटनास्थळी दाखल होऊन काही तासांत आग नियंत्रणात आणली गेली.
सध्या मेहकर नगरपरिषद कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने अनेक महत्त्वाची कागदपत्रे रेकॉर्ड रूममध्ये साठवण्यात आली होती. त्यामुळे या आगीत प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे.

100 Days Program : मागास नव्हे एकदम खास! गडचिरोली पोलिसांचा गौरव

विशेष म्हणजे, याआधी ३१ मार्च २०२२ रोजीही येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आग लागून कागदपत्रांची नासधूस झाली होती. त्यामुळे यंदाची घटना अधिकच संशयास्पद ठरते आहे. या आगीच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.