Purushottam Chitlange appointed as BJP District President : पुरुषोत्तम चितलांगे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
Washim वाशिममध्ये भाजपने ज्येष्ठ कार्यकर्त्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वाशिमसाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मंगरुळपीर येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांची भाजपच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र १३ मे रोजी चितलांगे यांना प्राप्त झाले. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने विविध जिल्ह्यांत नवीन नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. वाशिमसाठी चितलांगे यांची निवड ही पक्षाच्या संघटनात्मक कामगिरीवर आधारित आहे.
Amravati BJP : भाजपने केले अमरावतीचे तीन भाग; तीन अध्यक्ष दिले!
पुरुषोत्तम चितलांगे हे १९९२ पासून भाजपमध्ये सक्रीय असून, बुथप्रमुख, शहराध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा पल्ला २५ वर्षांहून अधिक आहे. मंगरुळपीर नगर परिषदेत ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
विविध निवडणुकांमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा त्यांना समृद्ध अनुभव आहे.त्यांच्या नियुक्तीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत चितलांगे यांचे जल्लोषात स्वागत केले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात एकच अध्यक्ष
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये भाजपने तीन किंवा दोन अध्यक्ष दिले आहेत. पण भंडारा, गोंदिया आणि वाशिममध्ये भाजपने प्रत्येकी एकच अध्यक्ष नियुक्त केला आहे, हे विशेष.