Breaking

Gondia BJP : गोंदिया जिल्ह्यात भाजपचे प्रथमच महिला कार्ड!

Sita Rahangdale is the first woman district president of BJP : जिल्हाध्यक्षपदाची धुरा सीता रहांगडाले यांच्या खांद्यावर, कार्यभार स्वीकारला

Gondia राज्यभरात जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करताना गोंदियामध्ये भाजपने महिला कार्ड खेळले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपने सिता रहांगडाले यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

नियुक्तीनंत सीता राहंगडाले यांनी अधिकृतरित्या पदभार देखील स्वीकारला. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे पक्षाच्या महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेला आणखी बळकटी मिळाली आहे.

पदभार स्वीकारण्याच्या प्रसंगी भाजपचे जिल्हा व मंडळ पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचा झेंडा हाती घेत आणि पक्षकार्याबाबत ठाम भूमिका मांडत रहांगडाले यांनी सांगितले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी प्रामाणिकपणे आणि कष्टाने सार्थ ठरवेन. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करणे, हेच माझं प्रमुख ध्येय असेल.”

Washim BJP : वाशीममध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यावर भाजपचा विश्वास!

गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी अनेक दिग्गज पुरुष नेत्यांनी जिल्हाध्यक्षपद भूषवले असले तरी, पहिल्यांदाच एका महिलेला ही संधी मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. महिलांमध्येही या निमित्ताने मोठा उत्साह दिसून आला. पक्षाच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वानुसार घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत भाजपच्या महिला मोर्च्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Akola BJP : अकोल्यात भाजपचे ओबीसी कार्ड; जयंत मसनेंवर विश्वास कायम!

सीता राहंगडाले यांनी आपल्या भाषणात महिलांच्या राजकीय सहभागाबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने भाजपने उचललेल्या पावलांबद्दल विशेष उल्लेख केला. “महिलांना संधी देऊन पक्षाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. मी ही संधी एक चळवळ म्हणून पाहते आणि आगामी काळात जिल्ह्यातील महिलांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

Amravati BJP : भाजपने केले अमरावतीचे तीन भाग; तीन अध्यक्ष दिले!

या कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सीताताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करत अभिनंदन केले. नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यात भाजपचे कार्य आणखी जोमाने सुरू राहील, असा विश्वास पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती पक्षासाठी निर्णायक ठरेल, असेही नेते म्हणाले.