Congress leader’s son goes missing the day before his wedding : ‘सामान घेऊन येतो’ असे सांगून घराबाहेर पडला होता
Amravati लग्नाच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड (वय ३०) बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. वैभव मोहोड याचे लग्न १४ मे रोजी होणार होते. मात्र, मंगळवारी (१३ मे) सकाळी ‘सामान घेऊन येतो’ असे सांगून तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो परतलाच नाही.
काही तास वाट पाहिल्यानंतर त्याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वैभवच्या बेपत्ताबाबत मिसिंगची नोंद घेतली आहे. वैभव मोहोड हे शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी मंगळवारी सकाळी एटीएममधून ४० हजार रुपये काढले होते, तसेच सुमारे ९० हजार रुपयांची रोख रक्कम त्यांनी घरातून नेतल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
Nagpur Haj House : वर्षानुवर्षे स्वच्छता नाही, पिण्याचे पाणी नाही, लिफ्टही बंद!
हरिभाऊ मोहोड हे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदीही झाली होती. ते काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे निकटवर्तीय मानले जातात. विचारवंत आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
Nagpur Municipal Corporation : रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणार का?
लग्नाच्या केवळ काही तास आधीच वैभव बेपत्ता झाल्याने मोहोड कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. अमरावती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे अधिकारी करत असून लवकरच काही ठोस माहिती हाती लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.