Shiv Sena leader Uday Samanta eat or cook khichdi at MNS president Raj Thackeray’s house : निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अशा भेटी अराजकीय असत नाहीत !
Nagpur : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील.. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहेत. पण यामध्ये एक तिसरी युती आकार घेऊ पाहाते आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना. दोन्ही राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यात एकी होण्याची चिन्हे दिसत असताना एकनाथ शिंदे गटाचे नेते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राज ठाकरे यांच्या शिवतिर्थावर येरझारा वाढल्या आहेत.
आत्तापर्यंत उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची तीन ते चार वेळा वेगवेगळ्या कारणांनी भेटी घेतल्या आहेत. दरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होत असाव्या, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. काल, मंगळवारी (१३ मे) उदय सामंत यांनी पुन्हा राज ठाकरेंची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मनसे आणि शिवसेना युतीबाबत चर्चांनी जोर धरला आहे.
Gopal Datkar : गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली तर मग उद्धव ठाकरेंचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. भाजपपासून वेगळे होऊन महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सतत पिछेहाटच झाली आहे. सध्याही उबाठाची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. त्यातच देशावर संकट आले, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले. या परिस्थितीत संपूर्ण देश भारला होता. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीकडे उबाठाने पाठ फिरवली आणि ते सहकुटुंब युरोपला फिरण्यासाठी निघून गेले. त्यामुळेही उबाठावर चौफेर टिका झालेली आहे. परिणामी त्यांच्या अडचणी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
खिचडी खाल्ली अन् निघालो..
काल राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले की, ‘सकाळी काही कामानिमित्त मी या भागात आलो होतो. माझे काम झाल्यावर राज ठाकरेंना कॉल केला. सहज गप्पा मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यांनाही वेळ होता, त्यांनी होकार दिला. राज ठाकरेंसोबत चर्चा केल्यानं ज्ञानार्जन होते, बरेचसे विषय कळतात. त्यामुळे ही भेट पूर्णपणे अराजकीय होती. चर्चेदरम्यान चहा घेतला, खिचडी खाल्ली अन् निघालो.’
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, त्या शेतकऱ्यांना वीज बिलात सलवत नाही
उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घरी चहा घेतला, खिचडी खाल्ली अन् ते निघाले. पण येथून निघून ते थेट एकनाथ शिंदे यांना भेटायला चाललो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ही भेट अराजकीय नव्हती, या चर्चेला बळ मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अशा भेटी झाल्या आणि त्याला कितीही अराजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला, तरी तो यशस्वी होत नाही. यातून राजकीय अर्थ निघतातच. त्यामुळे उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घरी खिचडी खाल्ली की शिजवली, हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.