Breaking

RTO Department : पुसद येथे आरटीओ कॅम्पमध्ये तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

Three officers caught by ACB in RTO camp in Pusad District Yavatmal : तिघेही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Nagpur : भ्रष्टाचाराने बरबटलेला विभाग म्हणून जिल्हा परिषदेच्या बरोबरीत प्रादेशिक परिवहन विभागाचा RTO नंबर लागतो. काही केल्या येथील भ्रष्टाचार थांबताना दिसत नाही. आधीच बदनाम असलेल्या विभागाला आणखी बदनाम करणारी एक घटना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे घडली आहे. यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुसद येथील RTO कॅम्पवर कारवाई करून तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि वणी येथे दर महिन्याला चार कॅम्प होतात. या कॅम्पसाठी मुख्यालयातून अधिकारी, कर्मचारी, चालक असा फौजफाटा जात असतो. त्या उपविभागातील लोकांसाठी RTO विभागाची कामे सोपी व्हावी, त्यांना येरझारा माराव्या लागू नये, यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पण या व्यवस्थेने भ्रष्टाचाराचे कुरणच तयार केले आहे. या कॅम्पमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या आहेत.

India Alliance : काँग्रेस पक्ष दिशाहिन झाला !

पुसद कॅम्पमधील भ्रष्टाचाराची कहाणी आजच्या कारवाईनंतर समोर आली आहे. गेल्याच महिन्यात भंडारा जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या RTO च्या देवरी चेकपोस्टवर एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ‘पुढच्यास ठेच – मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनी धडा घेणे अपेक्षीत होते. पण तसे झाले नाही आणि तीन अधिकारी पुन्हा एसीबीच्या जाळ्यात अडकले.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मयुर सुधाकर मेहकरे, सुरज गोपाल बाहीते, आणि विभीषण शिवाजी जाधव या तीन अधिकाऱ्यांसह बलदेव नारायण राठोड याला आज (१६ मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तिघेही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहेत. हिशोबाच्या पैशांमध्ये नेहमीच गडबड केली जाते. लोकांकडून पैसे उकळले जातात, अशी तक्रार दारव्हा येथील एका ड्रायव्हींग स्कूल चालक महिलेने यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वीही हे तीन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशा कारवायांतून थोडक्यात बचावले होते. भरारी पथकातही या तिघांनी असेच कारनामे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन – तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून वाचल्यानंतरही यांनी धडा घेतला नाही आणि आज अखेर जाळ्यात सापडलेच. वृ्त्त लिहिस्तोवर वसंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Indian Armi : ..आता जे.पी. नड्डांनीच माफी मागितली पाहिजे !

ही कारवाई एसीबीचे अमरावती पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अमरावती अपल पोलिस अधीक्षक सचिन शिंदे, उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अर्जुन धनवट, पोलिस निरीक्षक मनोज ओरके, पोलिस अंमलदार अतुल मते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम, सरीता राठोड व चालक अतुल नागमोते यांनी पार पाडली.