Will contest Legislative Council elections if teachers demand : बच्चू कडू यांनी दिले शिक्षक मतदारसंघातून लढण्याचे संकेत
Amravati विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात त्यांनी लवकरच शिक्षकांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या बच्चू कडू यांना नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता शिक्षक मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानभवनात प्रवेश करण्यासाठी ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
सध्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अपक्ष आमदार किरण सरनाईक करत आहेत. त्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे याच मतदारसंघातून आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
अलीकडेच अमरावतीमध्ये पार पडलेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात बच्चू कडूंनी निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी अंतिम निर्णय शिक्षकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील शिक्षकांचा समावेश होतो. या मतदारसंघातील निवडणूक नेहमीच चुरशीची ठरते. त्यामुळे बच्चू कडू या निवडणुकीत उतरत असल्यास राज्यभरात चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे.