New ward structure of Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेची नव्याने प्रभाग रचना; महायुतीकडून वाढीव जागांसाठी प्रयत्न
Akola अकोला महापालिकेतील प्रभाग, गट, वॉर्ड रचनेची प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे. जुलै २०२२ मध्ये आरक्षण सोडत झाली होती. मात्र, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत न धरता १५ टक्के वाढ करून नगरसेवकांची संख्या ८० वरून ९१ करण्यात आली होती. आता नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे आता महायुती आणि महाविकास आघाडी असली तरीही प्रत्येक पक्षाच्या इच्छुकांची संख्याही वाढली आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. शक्य तिथे महायुती म्हणूनच निवडणुका लढविण्यात येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांतील इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता जास्तीत-जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारत-पाकिस्तानमधील तणाव आणि त्यानंतर युद्धविरामानंतर सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले. त्यामुळे महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या शिंदे गटाने महायुतीतील जागांवर आपला दावा केला असून, शिवसेनेच्या ठाकरे गटाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत अकोला जिल्ह्यातील नेते सहभागी होणार असून, आघाडीच्या शक्यतांवर चर्चा होणार आहे.
भाजपनेही काही दिवसांपूर्वी संघटनात्मक फेरबदल केले आहेत. ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाने जिल्हा परिषदेसाठी २५ पेक्षा अधिक माजी सदस्यांची यादी तयार केली आहे.
Education : मुस्लीम आहे म्हणून मुलीला प्रवेश नाकारला, सचिव, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल !
अपक्ष व ठाकरे गटातील माजी सदस्यांना आपल्या गटात घेतले जात आहे. वंचित बहुजन आघाडी दलित वस्ती विकास निधी वळविण्यात आल्यामुळे आक्रमक झालेली आहे. ठाकरे गटातील तीन माजी सदस्य शिंदे गटात गेल्यामुळे त्यांना नवीन चेहरे शोधावे लागणार आहेत. काँग्रेसचे दोन सदस्य वंचितमध्ये गेल्याने काँग्रेसलाही नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना जिल्हा परिषदेवर नव्याने बांधणी करावी लागणार आहे.