Tribal department funds used for Ladaki Bahin scheme : समाजाचा निधी वापरल्याचा संघटनांचा आरोप
Nagpur विविध समाजाच्या संघटनांनी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतल्यानंतर आता आदिवासी समाजही पुढे आला आहे. आदिवासी समाजातील संघटनांनी या योजनेवर आक्षेप घेतला आहे. आमच्या समाजासाठी असलेला निधी योजनेसाठी वापरल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकार दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकास विभागाला आदिवासी विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद करते. परंतु अर्थसंकल्पात तरतूद केलेला संपूर्ण निधी आजवर आदिवासी विकास विभागाला कधीही मिळालेला नाही. विभागातील ३३५ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचे हस्तांतरण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाला करण्यात आले आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय ३० एप्रिल रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील आदिवासी समाज संघटनांनी सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. आदिवासी विकास विभागाचा निधी कपात केल्यास त्याचा परिणाम आदिवासींच्या कल्याणकारी योजनांवर होणार आहे. आजही आदिवासी भागात पक्के रस्ते, प्राथमिक शाळा, आरोग्याच्या सोयी सुविधा, वीज सारख्या मूलभूत सोयी सुविधा नाहीत.
असे असताना आदिवासींचा निधी इतरत्र वळविल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आदिवासींच्या विकास योजनांवर होणार आहे. आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधांअभावी, पोषण आहार न मिळत असल्यामुळे दरवर्षी हजारो बालके कुपोषण आणि इतर संसर्गजन्य साथीच्या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. हजारो आदिवासी वाड्यांवर आजही पिण्याचे स्वच्छ पाणी, विहिरी नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी आदिवासींना भटकंती करावी लागते.
३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधीचे हस्तांतरण रद्द करावे, अशी मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.मधुकर उईके यांनी दिली.