Pentakali rehabilitation project approved : पेनटाकळीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; ३५ वर्षांपासून संघर्ष
Buldhana : गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांना हक्काचे ४०१ भूखंड मिळाले. मात्र आता या यशाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय लढाई सुरू झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा करताना गावकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी देखील “आपल्या प्रयत्नांमुळेच प्रश्न मार्गी लागला” असा दावा करत स्थानिक राजकारणात श्रेय घेण्याची चढाओढ निर्माण केली आहे.
१९९८ पासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी नुकतेच १२ दिवस उपोषण केल्यावर खरात यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून ७.८२ हेक्टर जागेवर भूखंड वाटपाचे काम मार्गी लागले. समाजनिहाय भूखंड वाटप करताना गावात आमदार खरात स्वतः उपस्थित राहिले, तर केंद्रीय मंत्री जाधव यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला दिल्लीचा स्पर्श मिळाला.
या कार्यक्रमात स्थानिक राजकीय नेत्यांसह प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, उपस्थितांपेक्षा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो श्रेयवाद. प्रकल्पाला मंजुरी मिळणे हे गावासाठी ऐतिहासिक ठरले असले, तरी राजकीय श्रेयासाठी सुरु झालेली स्पर्धा स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते, असे निरीक्षकांचे मत आहे.